राजगृहावर अज्ञातांक़ून तोडफोड, आंबेडकरवाद्यांना शांत राहण्याचं आवाहन- प्रकाश आंबेडकर

Update: 2020-07-08 02:45 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. या प्रकरणानंतर आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे जनतेने शांतता राखावी आणि राजगृहाच्या आसपास जमू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राजगृहाच्या परिसरातील कुंड्या आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड दोघांनी केलेली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकरी अनुयायी येथे दररोज भेट देत असतात, इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, “ दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल,” असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

“भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी आमची मागणी आहे. मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Similar News