महाराष्ट्राबाहेरुन मुंबईत येणाऱ्यांसाठी महापालिकेचा सक्तीचा नियम

Update: 2020-08-07 16:28 GMT

अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यूच्या तपासावरुन बिहार आणि मुंबई पोलिसांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आता मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत प्रवास करुन महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आता सक्तीने 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी आलेल्या बिहारच्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याला महापालिकेने हातावर शिक्का मारुन सक्तीने क्वारंटाईन केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने काढलेल्या आदेशात जे सरकारी अधिकारी कामानिमित्त मुंबईत येणार असतील आणि त्यांना क्वारंटाईनमधून सूट हवी असेल तर त्यांना amc.projects@mcgm.gov.in या मेल आयडीवर येण्याच्या दोन दिवस आधी संपर्क करुन परवानगी घ्यावी लागणार आहे.

राज्य सरकारनं काढलेल्या आदेशातील क्वारंटाइनच्या नियमाचा हवाला देत मुंबई महापालिकेने देशांतर्गत प्रवास करुन येणाऱ्या व्यक्तीला १४ दिवस होम क्वारंटाइन राहणं अनिवार्य असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत आल्यानंतर काही सरकारी अधिकारी आयडी कार्ड दाखवून क्वारंटाइनमधून सुटका करुन घेतात, असे निदर्शनास आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे ज्या सरकारी अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामासाठी बाहेर पडायचं असेल त्यांनी दोन दिवस अगोदर तशी विनंती महापालिकेकडे करावी लागणार आहे.

Similar News