3 सिनेमे... मांडणी वेगवेगळी... विषय मात्र तो... ज्यावर समाजात बोलणंही पाप...! तीन्ही सिनेमांच्या केंद्रस्थानी आहेत 'नायिका'...! तीन्ही चित्रपटांची कथा या नायिकांभोवताली फिरते...! अर्थातच... ते तीन चित्रपट म्हणजे 'पिंक' 'पार्च्ड' आणि 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'.
सेन्सॉरने नाय-व्हय म्हणत परवानगी दिलेला 'लिपस्टिक अंडर...' हा चित्रपट. 'पिंक' हा दिल्लीत एकत्र राहणाऱ्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या तीन तरुण मुलींची कथा. 'पार्च्ड' हा गुजरातमधल्या एका छोट्या गावातील 3 महिलांची कथा. ज्या गावात सगळे निर्णय जातपंचायतच घेते. 'लिपस्टिक...' हा भोपाळमधल्या एकाच मोहल्ल्यात अथवा वस्तीत राहणाऱ्या ४ महिलांची कथा असलेला चित्रपट. भारतीय चित्रपट इतिहासात 'बाई' केंद्रस्थानी ठेवून तिच्या लैंगिक आणि एकूणच स्वातंत्र्याविषयी भाष्य करणारे चित्रपट येताहेत... ही खरं तर आनंदाची बाब आहे.
"किसी भी लडकी को किसीभी लडके के साथ बैठ कर शराब नहीं पिनी चाहीय. अगर वो ऐसा करती है तो लडके को वो इंडिकेट होता है की अगर लडकी मेरे साथ शराब पी सकती है तो उसके साथ सोने के लिये भी कतरायेगी नही..!" अमिताभ अर्थात सेहगल वकिलाच्या तोंडातील ही आणि अशी अनेक वाक्य बाईला नेहमीच गृहीत धरणाऱ्या सडक्या पुरुषी मेंदूच्या चिंद्या करतात.
'लिपस्टिक' मधल्या चौघीही वेगवेगळ्या वयाच्या आणि सांसारिक स्थितीमधल्या आहेत. एक आहे 'लीला' जिचं लग्न ठरलंय पण बाहेर प्रेमप्रकरण सुरुय. अगदी साखरपुड्यालादेखील रात्री मित्रासोबत सेक्स करणारी. सेक्स करताना बिनधास्त सेल्फी व्हिडीओ करणारी किंवा रात्री त्याच्या घरी जाऊन "बाथरूम खाली है क्या..? चल सेक्स करते है." असं विचारणारी. तिचं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे पण तिचा 'तो' मात्र तिला संभोगवस्तूप्रमाणे वापरून सोडून देतो.
तिसरी आहे 'रेहाना अबीदी'. एक कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी. जिला इतरांसारखं आयुष्य एन्जॉय करण्याचं आकर्षण आहे. ज्या बुरख्यात ती जखडली गेलीय त्याचाच वापर करून ती मॉलमध्ये फॅन्सी कपड्यांच्या चोऱ्या, पबमध्ये पार्टी या सगळ्या गोष्टी करते. जीन्सबंदीविरोधातील आंदोलनात "जीन्स की आझादी, जिने की आझादी" हे स्वातंत्र्य मांडते. तिचा वापर करून एकटा तिलाही सोडून देतो. चौथी आहे बुवाजी. एक साधारण पन्नाशीच्या पुढची बाई. जी चोरून 'तसली' पुस्तके वाचते. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथाही अशाच एका सेक्सस्टोरीतून पुढे पुढे जात राहणारी दाखवली आहे. स्विमिंग शिकवणाऱ्या पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या तरुण मुलाच्या सहवासासाठी बुवाजी स्विमिंग शिकायला सुरुवात करते. त्याच्याशी 'रोझी' नावाने फोन करून सेक्स चॅटही करते. बुवाजीचे हे कारनामे समजल्यावर तिला बाजारू औरत ठरवून घरातून बाहेर काढल जातं.
या चौघीचीही व्यथा तीच होते. समाजाची मर्द मानसिकता त्यांना कुचकामी ठरवते. त्या चौघीचेही 'तो' त्यांना सोडून जातो आणि मग समाजाची चौकट मोडलेल्या चौघीही एकत्र येऊन सेक्स स्टोरीतल्या रोझीची कथा पूर्ण करत सिगारेट ओढत या व्यथेचा सोहळा मांडत व्यवस्थेवर हसत राहतात असा शेवट. 'पार्च्ड' मात्र वेगळ्या पद्धतीने भाष्य करतो. बाईची घुसमट आणि दडपलेल्या भावना तो शारीरिकतेतून सुचकतेने मांडतो. राधिका आपटे अर्थात लाजो आणि राणी यांचं अर्धनग्न होऊन स्पर्शाच्या भाषेत एकमेकांची दुःख व्यक्त करणारा सीन अक्षरशः डोळे पानावतो.

चित्रपटाचा शेवट अंगावर येतो...'आज का दिन नारी का देवत्व मनाने का दिन है...इसी दिन माँ दुर्गा ने महिषासुर का वध किया..." असं म्हणत दुर्गेची स्तुती गाण्यात गाव एकीकडे दंग आहे तर दुसरीकडे या तिघीही या व्यवस्थेला नागड करून फाट्यावर मारतात...
तीन्ही चित्रपट समाजव्यवस्थेवर थेट भाष्य करतात. 'पिंक' अर्थात गुलाबी रंग हा बाईपणाचेच जणू प्रतीक. 'लिपस्टिक' हे बाईच्या आकांक्षेच तर बुरखा हे या धर्माचं कोंदण लाभलेल्या व्यवस्थेचं प्रतीक. 'Parched' म्हणजे ज्याला 'झुलसा हुवा' किंवा पोळलेल्या' असं म्हणता येईल. बाईच्या योनीशुचितेत अडकवलेली आणि वरुन धर्म नावाने सजवलेली व्यवस्था मुळात जाऊन बाईच्या या घुसमटीबद्दल भाष्य करत नाही. 'बलात्कार बाईच्या तंग कपड्यामुळे होतो, ही आणि अशी मांडणी बाईला संभोगवस्तू समजणाऱ्या मानसिकतेच्या मूळ विषयाला बगल देणारी ठरते. पुरुषाच्या पुरुषी मानसिकतेवर किंवा मर्दपणाच्या अहंकारावर बोलणं घडतच नाही.
बाईच्या या साऱ्या घुसमटीची मुक्तता तिच्या लैंगिक मुक्ततेत आहे आणि अंजली जोशींची बेटी डॉडसन सांगते त्याप्रमाणे बाईची लैंगिक मुक्ती ही अपराधमुक्त हस्तमैथुनातही आहे. 'लिपस्टिक' चित्रपट पाहून थिएटर मधून बाहेर पडताना एक आवाज कानावर आला आणि पुन्हा सुन्न झालो. "च्यायला... ह्यापेक्षा बिप्या बघितल्या असत्या तर चाललं असतं." बऱ्याच जणांना तो चित्रपट समजलाच नाही. पण काहीही असो. "पुरुषाचा माणूस व्हावा" ही अपेक्षा ठेऊन या विषयावर चित्रपट निघणं मात्र महत्वाचं आणि आपल्यासारख्यांनी तो बघून उचलून धरणं हे ही महत्वाचं.
- विनायक होगाडे