मित्राने लक्षात आणून दिलेला हा प्रकार...अमेझॉन हे ऑनलाईन पोर्टल या आधी देखील अनेकदा वादात सापडलंय. तो वाद राष्ट्रीयत्वाचा, तिरंग्याच्या अपमानाचा होता. मात्र आता अश्या प्रकारचा ऍश ट्रे विकणं म्हणजे कहरचं झाला. त्यांचं वर्णन वाचल्यावर आणि फोटो पाहिल्यावर आधी प्रतिक्रिया येते ती म्हणजे ‘काय विकृती आहे’. बरं याला विकृती म्हणायचं का हा प्रश्न देखील काही जण विचारतील. तर त्याचं उत्तर हो ही विकृतीच आहे असं आहे. याला कला प्रकार तर नक्कीच म्हणता येणार नाही. न्यूड पिक्चर्स, पेंटींग्स, शिल्प यासह इतरही कलाप्रकार आपण पाहिलेले आहेत. पण त्यातही कलेचा दृष्टिकोन आहे निदान साकारण्याऱ्याचा तरी.
मात्र या ऍश ट्रे चा उद्देश म्हणजे निव्वळ स्त्रिच्या शरीराचं बाजारीकरण, तिला उपभोग्य वस्तू म्हणून विकणं एवढाचं दिसतो. आणि तिच्या गुप्तांगाच्या जागी सिगारेट विझवून विकत आनंद मिळणं इतकाचं आहे. गोल्डन ब्राऊन रंगाची स्त्री पाय पसरून बसलेली दाखवणं आणि त्यातही तिच्या गुप्तांगात सिगारेट विझवण्याची सोय करून देणे हा तर निव्वळ सैतानी मानसिकतेचा आविष्कार आहे. स्त्रिचं शरीर आणि तिची कमनियता यांचं कलेतून केलं जाणारं सादरीकरण आणि अशाप्रकारे विकृत रूपात त्यांचं केलं जाणारं सादरीकरण यात नक्कीच मोठा फरक आहे. स्त्रीला sex object म्हणून पाहणं, सादर करणं हे आत्ताचं नसलं तरी गेल्या काही काळात ते चांगलंच वाढलंय
पुरुषांची अंतर्वस्त्र त्यासाठीच्या पावडरी, साबण, डिओड्रंट अशा एक ना अनेक वस्तूंच्या जाहिरातीत स्त्रीला अशाचं पद्धतीने सादर केलं जातं. अगदी “ये तो बडा टॉईंग है” ही जाहिरात असेल किंवा शिला की जवानी सारखी गाणी असतील किंवा मग कॉन्डमची जाहिरात असेल. बंर स्त्रियांच्या वस्तूंसाठीच्या जाहिरातीही अशाच स्वरूपाच्या असतात.
मुळास सेक्स ही आपल्याकडे अजूनही खाजगीत बोलण्याची, कुजबुजण्याची गोष्ट आहे आणि तिथेच खरी गोम आहे. सेक्स ही नैस्रगिक गरज आहे हे एकदा मान्य केलं की मग स्त्रि आणि पुरुष या दोघांसाठीही ती बाब नैसर्गिक मानली पाहिजे. मात्र आपल्या समाजात पुरुषांची गरज ती गरज आणि स्त्रिने गप्प बसणं, कुंठत राहावं, तोंडातून त्याबद्दल ब्र काढणं, आपल्या इच्छा बोलून न दाखवणं म्हणजे परंपरा जपणं अशी धारणा आहे. पुरुषांच्या बाबतीत अगदी असं नसलं तरी निदान व्यक्त होणं त्यांना शक्य आहे पण ते ही मानसिक चौकटीतच. यात बंधनाचा, योग्य ठिकाणी मोकळं न होता येणं आणि सेक्सला taboo समजण्याच्या वृत्तीमुळे आपल्याकडे सेक्सबाबत जागरूकता, मोकळेपणा कमी आणि विकृती जास्त आहे. याच वृत्तीची उदाहरणं अनेकदा समोरं येतात. मग, निर्भया प्रकरणातील अल्पवयीन दोषीनं केलेलं घृणास्पद कृत्य असो की, पुरुष तर असं करणारच बाईनेच सांभाळून राहायला हवं किंवा बाईच पुरुषाला असं कृत्य करायला भाग पाडते अशी नेत्यांकडून केली जाणारी व्यक्तव्य असो.
आतापर्यंत घरगुती हिंसाचार, बलात्कार, प्रकरणांमधून गुप्तांगाला चटके देणे, त्या भागाला जखम करणे , चिरफाड करणे असे प्रकार घडत होते. हा प्रकार चुकीचाच आहे मात्र एखाद्या वेळेचा राग शांत करण्यासाठी, स्त्रीला गप्प बसवण्यासाठी, मर्दानगी दाखवण्यासाठी ही सगळी नीच कृत्य केली जायची, हेही चुकीचं आहे पण हे कृत्य क्षणिक म्हणता येईल. मात्र आथा सिगारेट सारख्या व्यसनांचा आनंद लुटून आल्यानंतर ती विझवण्यासाठी जर स्त्रिच्या गुप्तअंगाच्या भागाला ऑब्जेक्ट बनवून ऍश ट्रे सारखी वस्तू विकली जात असेल तर याचा निषेधच केला पाहिजे.
मात्र निषेध करण्यासोबतच ही विकृती वाढू नये यासाठी समाजात आणि समाजाच्या मासिकतेत बदल घडवणंही गरजेचं आहे. योनी पुजेचा दाखला जरी दिला तरी आपल्याकडे अनेक मातृशक्ती देवता आहेत. ज्यांना आपला समाज पूजनिय मानतो. मग त्या शक्तींचच मानवी रूप असलेल्या महिलेला किंवा स्त्रिला अगदी देवीचा दर्जा नाही निदान समानतेचा , माणूसपणाचा दर्जा द्यायला हवा. तिच्याकडे केवळ सेक्स ऑब्जेक्ट म्हणून पाहण्याऐवजी आपल्यासारखीच फक्त निसर्गाने काही कारणासाठी दिलेलं एक वेगळं रूप आणि शरीर घेऊन या समाजात वावरणारी ती एक व्यक्तीच आहे. इतकं जरी मान्य केलं आणि त्याचं अनुकरणं केलं तरी बऱ्याचश्या समस्या सुधारण्याची शक्यता आहे.
नाहीतर निर्भया, शक्ती मिल किंवा गेला काळ भौवंरीदेवी सारख्या घटना कमी होण्याऐवजी वाढतील हे नक्की...