मुस्लिम समाजाबद्दल चर्चा करताना आवडीनं चघळला जाणारा विषय म्हणजे ट्रिपल तलाक. जणू काही मुस्लिम समाजाच्या सर्व प्रश्नांचे मूळ या ट्रिपल तलाकमध्येच दडले आहे. खरे तर 'मुस्लिम समाजाचे प्रश्न' हा विषय डालविण्यासाठी 'मुस्लिम महिलांचे प्रश्न' अशी मांडणी जाणूनबुजून केली जाते. म्हणजे मुस्लिम समजत मुलांचे, प्रौढांचे, तरुणांचे, वृद्धांचे म्हणजे एकूण कोणाचेच काहीच प्रश्न आणि समस्या नाहीत. केवळ मुस्लिम महिलांच्याच समस्या आहेत असे म्हणायचे आहे की काय हे कळत नाही. मुस्लिम समाजाच्या मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी 'मुस्लिम महिलांचे प्रश्न' म्हणून बोंब ठोकायची आणि मुस्लिम समाजाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत ते दाबून टाकायचे अशी भूमिका नेहमी घेतली जात असल्याचे दिसते आहे.
घटस्फोट समस्या की उपाय?
ट्रिपल तलाकबद्दल बोलण्यापूर्वी मुळात हा विषय स्पष्ट होणे गरजेचे आहे की घटस्फोट तुमच्या दृष्टीनं समस्या आहे की उपाय? जर तुम्ही घटस्फोटाला समस्या मानीत असाल तर ही संस्थाच मुळात बंद करण्यासाठी तुम्ही उभे राहिले पाहिजे. समाजात केवळ विवाहच झाले पाहिजेत, विवाहित जोडप्यांचा घटस्फोट होताच कामा नये. पत्नीने नशिबाला आले ते मुकाट्याने सहन केले पाहिजे. पतीने मन मारून निभाव केलाच पाहिजे. परंतु मानवी अधिकारात घटस्फोट हा एक अधिकार म्हणून मान्यता देणारा जगातील पहिला धर्म इस्लाम असल्याने मुस्लिम समाज घटस्फोटाकडे समस्या म्हणून नव्हे तर उपाय म्हणून पाहतो.
वैवाहिक जीवन त्रासदायी झाले असेल तर का त्रास सहन करावा? एकत्र राहणे जमत नसेल तर का रेटावे हे कथित बंधन? साथीदार न्याय वागणूक देत नसेल तर का जबरदस्ती करून त्याच्याच सोबत राहण्यास विवश असावे किंवा करावे? कसलेच भावनिक बांध राहिले नसतील तर केवळ सोबत झोपण्यासाठी का ओढावे एकमेकांना? मारहाण, छळ, अपमान, तिरस्कार इ. गोष्टी दैनंदिनी झाल्या असतील तरीही का म्हणून का म्हणून घ्यावी पायात लोळण? मुळात फरक मान्यतेमध्ये आहे. भारतीय धर्म परंपरा विवाहाला एक बंधन मानतात तर इस्लामी दृष्टिकोनात तो एक करार आहे. ज्यांना बंधन पाळायची आवड आहे त्यांनी पाळावे हे बंधन, परंतु ज्यांचा दृष्टीत विवाह एक करार आहे त्यावर आपले दृष्टिकोन लादू नये.
भारतात घटस्फोटाचे प्रमाण
आपला देश जगातील सर्वात कमी घटस्फोट होणारा देश आहे. युरोपीय देशात दर हजारी विवाहामध्ये घटस्फोटांचे प्रमाण ५० टक्केपेक्षा जास्त आहे तर भारतात हे प्रमाण केवळ १३ टक्के आहे. म्हणजे आपल्या देशात १०० जोडप्यांपैकी केवळ १३ जोडपी विभक्त होतात. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात घटस्फोटितांची संख्या २३ लाख ४३ हजार इतकी आहे. यातील ६८ टक्के घटस्फोटीता हिंदू असून मुस्लिम महिलांचे प्रमाण २३ टक्के आहे. म्हणजे १२५ कोटी लोकसंख्येचा हा देशात जर आपण २५ कोटी जोडपी जरी गृहीत धरली तर त्यापैकी केवळ १.३ टक्के या मानाने २३ लाख जोडप्यांचे घटस्फोट झालेले आहेत. तसेच प्रत्येक घटस्फोट झालेली पीडितांचे असेल हे तुम्ही कशावरून ठरवता? घटस्फोट तिच्यासाठी वरदान ठरले असल्याची शक्यता कोणत्या आधारावर नाकारता?
तलाक
मुस्लीम समाजातील काही वेड्या लोकांमुळे तलाक हा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. “उचलली जीभ लावली टाळ्याला” नियमानुसार तोंडी तलाक म्हणताच तलाक अस्तित्वात येतो असा गैरसमज या बहाद्दरामुळे निर्माण झाला आहे. तसेच तलाक म्हणजे पुरुषांच्या हाती लागलेले स्त्री शोषणाचे माध्यम असे चित्र समाजासमोर आले आहे. 'तलाक' चा शाब्दिक अर्थ आझाद करणे असा आहे. परंतू तोंडातून निघताच तलाक होत नसते तर याची एक Procedure आहे.
ज्या क्षणी पतीला असे वाटत असेल की मी माझ्या पत्नीबरोबर राहू शकत नाही, तिला नांदवू शकत नाही, तेव्हा इस्लाम त्याला दोन्ही कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींच्या मध्यस्थीने समेट घडविण्याचा प्रयत्न करावा म्हणून मार्गदर्शन करतो. कुरआनमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे, “जर पती पत्नीमध्ये वितुष्टाचे भय असेल तर पतीच्या संबंधितापैकी एक मध्यस्थ आणि पत्नीच्या संबंधितापैकी एक मध्यस्थ नियुक्त करावा. जर ते दोघे समझोता घडवून आणू इच्छित असतील तर अल्लाह उभयपक्षी पती-पत्नीमध्ये समेटासाठी अनुकूलता निर्माण करेल.” (पवित्र कुरआन ४:३५) पती आणि पत्नीने आपापल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या समक्ष आपली समस्या मांडावी, या समस्येचे निराकरण त्यांच्या मार्गदर्शनाने होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने शक्य न झाल्यास जाणकार व्यक्तीने Counseling करण्याची इस्लाम तरतूद करतो. Counseling केल्यावरही समस्या सुटत नसल्यास आता दोघांना विभक्त होण्याचा अधिकार आहे. Counseling साठी मुस्लिम समाजाने जागोजागी 'दारुल कजा' स्थापन केले आहेत. जेथे या समस्यांचे निराकरण केले जाते. जर निराकरण होत नसेल तर शेवटी तलाकचा पर्याय आहेच!
पतीने पत्नीला तलाकचा आपला इरादा बोलून दाखवावा, अर्थात तलाक म्हणावे. तलाकनंतर इस्लाम ३ महिन्यांचा 'पुनर्विचार' मुदत पतीला देतो. या तीन महिन्यासाठी पत्नी पतीच्या घरीच मुक्कामी असेल. पत्नीच्या न्याय मागण्या पूर्ण करणे पतीसाठी अनिवार्य असेल. तिला पूर्वीसारखीच वागणूक देणे, तिच्या तब्येतीची काळजी घेणे, तिचा सर्व प्रकारचा आर्थिक भार पेलणे हे पतीचे कर्तव्य आहे. या 'पुनर्विचार' कालावधीत जर पतीला असे वाटले की आपण चुकलोय तर तो समेट घडवू शकतो. समेट न घडवता तो आपल्या निर्धारावर ठामच असेल तर मुदतीच्या अंती तलाक होईल.
तोंडी तीन तलाक आणि इस्लाम
राहिला प्रश्न तोंडी तीन तलाकचा, तर ट्रिपल तलाक प्रथा मुस्लिम समाजातील कुप्रथा असून याचा इस्लामशी काडीचाही संबंध नाही. मुस्लिम समाजातील धर्म अभ्यासक आणि मौलवी लोक जुमा खुतब्याच्या माध्यमातून समाजाला या कुप्रथेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न नेहमीच करीत असतात. तोंडी तिन्ही तलाक देऊन मोकळे होणारे स्वतःवर देखील अन्याय करतात आणि आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतात, यावर कोणाचेही दुमत नाही. तोंडी तीन तलाक प्रथा केवळ कायदा केल्याने बंद होणार नाही तर यासाठी मोठ्या प्रमावर समाजप्रबोधन गरजेचे आहे. मुस्लिम समाजातील जमियत अहले हदीस या सुधारणावादी मुस्लिम संघटनेने मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती घडवून आणली आहे आणि ट्रिपल तलाक हद्दपार करण्यात मोलाची कामगिरी पार पाडली आहे.
मुस्लिम समाजाचे वास्तविक प्रश्न
मुस्लिम समाजात सुधारणा हवी असेल तर हे दुय्यम मुद्दे सोडून द्या आणि शिक्षण, आरक्षण, संरक्षण आणि मुस्लिम समाजाचे राजकीय नेतृत्व या प्रश्नावर बोलणे गरजेचे आहे. हे मुस्लिम समाजाचे ज्वलंत प्रश्न आहेत. आज मुस्लिम समाजाचा आर्थिक स्तर खालावल्याने त्यांना शिक्षण विकत घेणे शक्य नाही म्हणून उच्च शिक्षणात मुस्लिम समाजाची गळती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरी देखील हा समाज आपल्या पोरांना कामाला लावून पोरींना शिकवत आहे. यांना शैक्षणिक आरक्षण देणे काळाची गरज आहे. तसेच मुस्लिम समाज भयंकर असुरक्षित वातावरणात जगतोय. त्यांच्या मनात शासन आणि प्रशासनबद्दल शंका निर्माण व्हाव्यात अश्या काही घटना वारंवार होत असताना दिसत आहेत. तरीही मुस्लिम समाज धैर्याने सर्व काही सहन करीत आला आहे. म्हणून या समाजाला संरक्षण देणे गरजेचे आहे. विकासासाठी शांती आणि सुव्यवस्था गरजेचे आहे. मुस्लिम समाजात अशांतता निर्माण करून, त्यांना भयांकित करून त्यांचा विकास कसा साधता येईल?
- मुजाहिद शेख