दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
मुलगी असो की मुलगा तरूण वयचं असतं हे गाणं गुणगुणायच आणि प्रत्यक्ष जगायचं. पण, प्रत्येकाच्या नशीबी हे सुख असतच असं नाही. प्रत्येकाच्या मनाला ही ओढ असते. प्रत्येक जीव नवसंसाराचे स्वप्ने रंगवतो मनात रूजवतो. पण, सर्वांनाच ती लाभतात असे नव्हे. काहींना ती दडपावी लागतात. स्वत:ला संपवून जाळावी लागतात. वर्तमान पत्रात बातमी वाचली, दोन वर्षांपासून विवाह थांबल्याने शेतकरी कन्येची आत्महत्या. लातूर जिल्ह्यातील शिसोवाघेली येथील घटना. चिठ्ठी लिहून २१ वर्षीय शितलने घेतली विहरीत उडी. मन सुन्न करणारी घटना.
आपल्या समाजात आजही हुंड्यासाठी मुलींना आत्महत्या करावी लागते. किती दिवस चालणार हे असंच. फुल, कर्वे, शाहूमहाराजांनी कयीक वर्षांपूर्वी जात परंपरेविरोधात बंड पुकारले तरी आजही बळी जात आहेत. हुंड्याच्या प्रथेला बळी पडलेली आपल्या समाजात शितल एकटीच नाही. जिला जीव द्यावा लागलाय या जाचक रूढीपायी. शितलला वाटलं की मी स्वत:ला संपवल म्हणजे ओझ कमी होईल माझ्या बापाचं.
पण बाळा तुझ्या बापाच्या भाळी तू जखम देवून गेलीस अश्वत्थामाची
अगं अगं पोरी
विचार कर थोडा करी
नकोस घालू घाव
माय बापाच्या उरी
मान-पान, करणी-धरणी, रिती-रिवाज यांची स्पर्धा कुठेतरी थांबली पाहिजे. साधेपणाने पण समाधानाने आपले जीवन कसे समृद्ध, संपन्न करता येईल हा विचार पालक समाज मनामध्ये कधी रूजणार आणि मुलींचे जीव आबाधीत कधी होणार म्हणजे आपोआपच सकारात्मकता निर्माण होईल.
एक बातमी शितलच्या आत्मह्त्येची आणि दुसरी बातमी भीम अॅप योजना. ‘लातूरच्या कन्या कु. श्रद्धा मेंगशट्टे हीला पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते एक करोडचे बक्षीस’ विरोधाभास (दोन्ही लातूरच्या कन्या) एकीकडे तंत्रज्ञानाचा वापर करून मुली कुठल्या कुठे पोहोचतात आणि एकीकडे ह्यंड्यासाठी आत्महत्या. कुठेतरी विचार व्हायला हवा. विचारप्रवाह बदलायला हवा.
आत्महत्या करणे स्वत:ला संपवणे हा कुठल्याही समस्येवर अथवा संकटावर उपाय नाही. सर सलामत हो तो पगडी पचास. जीव जगला तर कितीही संकटांचा सामना करत समस्यांवर मार्ग सापडतील. आपल्यालाच अगदीच सामान्य कुटंबातल्या बिकट परिस्थितीतल्या संकटाला मात करणाऱ्या आदरणीय सिंधूताई सकपाळ यांच्याकडे पाहिले की वाटते स्वत:ला सावरत समाजाचा उद्धार करावा हा आदर्श खचलेल्या कोमेजलेल्या जीवांसमोर त्यांनी ठेवला.
ह्यंड्यासाठी रितीरिवाज, परंपरेसाठी नुसते वरपक्षाला जबाबदार धरून दोष ठेवून चालणार नाही. तर मुलींनी, पालकांनी ठरविले पाहिजे की जाचक, रूढी, बडेजाव भपकेपणाला किंमत न देता गरीब असला तरी होतकरू प्रामाणिक व हुंडा न घेणाऱ्या मुलाशीच माझ्या मुलाचे मी लग्न करेन
स्वत:ला संपविण्यासाठीही खूप हिम्मत लागते ती हिंमत चांगल्या कामासाठी वापरावी. जीवंत राहून संकटाशी सामना करण्यासाठी वापरली तर किती बरे होईल. स्वत:चे आणि समाजाचेही. माझ्या बापाकडे लग्नासाठी पैसे नाहीत, माझे लग्न होत नाही म्हणून मुलींनी खचून न जाता स्वत: खंबीर व्हा. जमेल ते चांगले काम जीव ओतून करा. स्वत:च्या पायावर उभे रहा. समाजासमोर आणि परिस्थितीने पिचलेल्या तरूणींसमोर एक चांगला आदर्श निर्माण करा.
पोरींनी आत्महत्या करून
स्वत:ला संपविण्यापेक्षा
खंबीर व्हा. सामना करा
मायबापाला आधार द्या.
विमल मुदाळे, लातूर
९७६७७८३२७