अगदी अठरा वीसच्या वयातील मुली तलाकशुदा बच्चेवाली होतात. या अठरा वीस वर्षांच्या मुलींचे नवरे काहीवेळा तीन चार वर्षांनी तर काही वेळा अगदी आठ-नऊ वर्षांनीही मोठे असतात. अशा परिस्थितीत या तरूण असणार्या मंडळींचा तलाक या संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टीकोन काय असेल हे स्पष्टच आहे. खरंतर अशा पद्धतीने तलाक देऊन मोकळी होणारी ही मंडळी बहुतांश करून आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील असतात. राग-लोभाच्या क्षणी स्वत:वरचा ताबा जातो आणि पत्नीला तलाक म्हणून मोकळे होतात. अशावेळी एक प्रश्न पडतो की, धर्मातील अनेक गोष्टींना सोयीप्रमाणे तिलांजली देणार्या या लोकांना तलाकसारख्या गोष्टी हातातलं कोलित का वाटतं? आपण असा तीनदा उच्चार केला की नातं आता मोडलंच ही धारणा कशी मुळ धरू लागते?
आपण शंभरटक्के धर्मपालन करत नाहीयोत हे व्यवस्थित माहित असतानाही, तलाक किंवा दुसरं लग्न किंवा तलाकनंतर आपल्याच बायकोला पुन्हा आपल्यासोबत बोलविण्यासाठी हलालसारख्या गोष्टींचे पालन करण्याची कथीत सुबुद्धी कुठून लाभत असावी? जगण्यातल्या या अंतविर्रोधाकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. सोयीनुसार धर्माचा वापर करण्याची वृत्ती बळावलेली आहे. तिलाच आपण खरं धर्मपालन समजत असू तर मग माणूसधर्माचं काय करायचं? की तेही आपल्यासोयीनुसार. आपल्या मुलीवर तलाकची कुर्हाड पडली तर या प्रथा चूकीच्या अन्यथा त्या प्रथांशी आमचं काही देणं घेणं नाही. पण जर कोणी ही प्रथा बंद करण्याची भाषा करत असेल तर ते आमच्या धर्मविरोधी आहे. आमच्या धार्मिक गोष्टी प्रदूषित करण्याचा प्रयत्न आहे असंही मानणारा वर्ग आहे. ही लोकं सर्वाधिक गोंधळलेली असतात. एकतर आपल्याविरूद्ध कोण बोलतंय आणि आपल्या बाजूने याचा त्यांना कुठलाही गंध नसतो केवळ इस्लामची महती गायली ही मंडळी खूश होऊन जातात. पण सर्वात डेंजर जमात हीच. अर्धवट ज्ञानी माणसे जितकी घातक तितकीच अर्धवट धर्मपालन करणारीही.
एकीकडे असा संकुचित एक तरूण वर्ग आहे म्हणून तर अशा प्रश्नांविरूद्ध लढे उभारावे लागत आहे. दुसरीकडे संकुचितपणाच्या कक्षा मोडणारा तरूण वर्ग विस्तारत आहे, जे की आशादायी आहे. तंत्रस्नेही असणार्या हा तरूण तलाकसारख्या प्रश्नांच्याबाबतीत सेंसीटाईज झाल्याचा दिसत आहे. या प्रथा सुरू रहाव्यात की बंद व्हाव्यात यावर कदाचित थेट भूमिका घेणारा नसेलही पण किमान या प्रश्नांतील गुंतागुंत समजून घेऊ लागला आहे. तलाक इस्लामिक पद्धतीने द्यावयाचा असला तरी त्याची नेमकी पद्धत काय आहे तेही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तोंडी तलाक ही पद्धत चूकीची आहे अशी किमान आता कुजबुज घडत आहे. तरूणीही आपल्या हक्कांच्या बाबतीत जागृत झाल्या आहेत. कोणी तलाक म्हणण्याची हिंमत केलीच तर त्याही आता त्याविरूद्ध कोर्टापर्यंत दाद मागायची हिंमत ठेवू लागल्या आहेत. आपण लगेच तलाकपीडित होऊन आयुष्य कुंठत काढण्यापेक्षा चूकीच्या मार्गाने तलाक देणार्यांना सरळमार्ग दाखविण्याची धमक तरूणी ठेवताना दिसत आहेत. विवाहित जोडप्यांचं जमणार नसेलच तर त्यांच्यासाठी कायदेशीर मार्ग, दोन्ही पक्षांची बाजू समजून घेण्याची प्रक्रिया ही अधिक उजळ असल्याचंही चित्र या तरूणांना पटत आहे.
अर्थात व्हर्च्युअल जगात माणसं जितकी चांगली आणि प्रगल्भ वागतात प्रत्यक्ष वास्तवात ती तशीच वागतील याची काहीही खात्री देता येत नाही. उलट काहीवेळा असं वाटतं, माणसाला दुटप्पीपणाचं सोंग या व्हर्च्युअल जगाने अधिक मोकळेपणाने घेण्याची मुभा दिलेली आहे. हे जरी खरं मानलं तरी तलाकसारख्या इश्यूजवर चुप्पी न ठेवता तरूण-तरूणी बोलू लागल्या आहेत, मतं मांडू लागल्या आहेत हे महत्त्वाचंच मानायला हवं. कारण त्याशिवाय सामाजिक प्रश्नांची घुसळण होऊ शकत नाही. सध्या ती घुसळण मुस्लिम तरूणांत जोरात सुरू असल्याचं दिसत आहे आणि त्यातूनच अशा प्रथांचा वाईट परिणाम आणि अनावश्यकता उघडकीस येण्यास मदत होईंल, हे निश्चित.
-
हिनाकौसर खान-पिंजार