रायगड किल्ल्याच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली वृक्षतोड

Update: 2020-02-18 12:55 GMT

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या सुशोभिकरणच्या कामाला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर कामाला सुरूवातही झाली आहे. किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा असलेल्या प्राचीन 3 हजार वृक्षांवर मात्र कुऱ्हाड कोसळली आहे. सरकारने ही वृक्षतोड तात्काळ थांबवावी अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे. रस्ता रुंदीकरणा दरम्यान छ. शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी वृक्षतोड थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नुकतीच भेट घेऊन केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याचं आश्वासन दिले आहे.

किल्ले रायगडचा परिसर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड नातेखिंड प्रवेशद्वार येथून सुरू होतो. इथूनच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. नातेखिंड प्रवेशद्वारापासून किल्ले रायगड ते पाचाड गावापर्यंत 24 किलोमीटरचा हा रस्ता आहे. खिंडीतून प्रवेश केल्यापासून छ. शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना उजाळा मिळतो. हिरवळीने दाटलेल्या रस्त्यावरून जाताना वैभव संपन्न किल्ले पाहण्याच्या भावनेने मन प्रसन्न होते.

या साऱ्या प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा असलेली मोठमोठी वृक्ष व त्यांची सावली वाटसरूंना आधार देते. मुंबई गोवा महामार्ग नातेखिंड प्रवेशद्वार ते माँसाहेब जिजाऊ पाचाड समाधी स्थळ या दरम्यान साधारणतः ३ हजार वृक्षांची बेछूट कत्तल होणार असल्याचं पर्यावरण प्रेमी सांगत आहेत. पहिल्या टप्प्यात सरकारने संबंधित कंत्राटदाराला एक हजार वृक्ष तोडण्याची परवानगी दिली आहे. माणगाव निजामपूरमार्गे देखील किल्ले रायगडकडे येणाऱ्या मार्गावर वृक्षतोड केली जाणार आहे.

सुशोभिकरणाच्या कामाला विरोध नाही मात्र रुंदीकरणाच्या नावाखाली अवास्तव वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीदेखील या वृक्षतोडीवर आक्षेप घेतला असून आवश्यकता नसताना ज्या ज्या ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली त्यासंदर्भात चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली आहे. तर माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी छ. शिवाजी महाराजांच्या पर्यावरण नीतीविरोधात ही वृक्षतोड होते असल्याची टीका केली आहे.

सदर वृक्षतोड थांबवा अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिलाय. यासंदर्भात एनएचपी डब्ल्यूडीचे अधिकारी रत्नाकर बामणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की किल्ले रायगड सुशोभिकरणाच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार वनविभागाकडून परवानगी घेऊन वृक्षतोड केली जात आहे. मात्र सद्यस्थितीत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्षतोड बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याने काम थांबवले असल्याचा दावा केला असला तरी मॅक्स महाराष्ट्रने केलेल्या पाहणीत तिथे सोमवारपर्यंत वृक्षतोड सुरू असल्याचं दिसतंय.

Similar News