पोलिसांच्या सतर्कतेमुळे पालघरमधील 'हिंगणघाट' टळले

Update: 2020-02-14 08:07 GMT

पालघरमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे हिंगणघाटसारखा पेट्रोल टाकून एका तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न टळला आहे. लग्न मोडल्याचा राग मनात धरून पेट्रोल आणून मुलीच्या आईला व तिच्या लहान बहिणीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा हल्ला करण्याअगोदरच पोलिसांनी गुरूवारी रात्री आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव भैरोसिंग राघूवीरसिंग राठोड असून तो २८ वर्षांचा आहे. त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केल्यानंतर त्यात पेट्रोल भरलेली बाटली आढळून आली. आरोपी राजस्थानमधील अजमेर इथला असून संबंधित मुलीवर आणि तिच्या आईला मारण्यासाठी तो आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पालघरमधील राहणाऱ्या एका मुलीच्या घरच्यांची या आरोपीसोबत लग्नाची बोलणी सुरू होती. पण त्यानंतर हा आरोपी काहीच काम करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी या लग्नाला नकार दिला. या मुलीने त्यानंतर दुसरीकडे लग्न केले.

याचा राग मनात धरून आरोपीने मुलीच्या आईला आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिस तपासात आरोपीचे मोबाईल लोकेशन पालघरचे दिसत असल्याने पोलिसांनी रेल्वे स्थानकात सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.

Full View

Similar News