पबजी गेम खेळता खेळता तो कोसळला...

Update: 2020-01-20 08:14 GMT

लहान मुलं आणि तरुणांमध्ये सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या पबजी गेमनं राज्यात आणखी एक बळी घेतलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये पबजी गेम खेळत असताना 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हर्षल मेमाणे असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेम खेळत असताना हर्षल अचानक बेशुद्ध पडल्याची माहती त्याच्या नातेवाईकांनी दिलीये. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात राहणाऱ्या हर्षलचा पबजी गेम खेळत असताना तणावातून मृत्यू झाल्याची शक्यता आहे. शुक्रवारी हर्षल हा नेहमीप्रमाणे घरात पबजी गेम खेळत होता. अचानक त्याला झटका आला आणि तो बेशुद्ध पडला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने खासगी रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र, पहाटेच्या सुमारास त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. हर्षल गेल्या काही वर्षांपासून बेरोजगार होता. पूर्वी तो हाऊस किपिंगचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पबजी गेम जास्त खेळल्याने त्याच्यावर ताण येऊन त्याचा मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

Similar News