१२ सेकंदात सरकारची कहाणी !

Update: 2020-07-05 14:47 GMT

कोरोना संकटाच्या काळात वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सरकारने सुरू केला. त्यात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली एका दिवसांत रद्द झाल्यानंतर आता उध्दव ठाकरे सरकारने दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात माहिती देताना मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केलेल्या अंतर्गत बदल्या रद्द करण्यात आल्याचं सांगितले आहे.

अनिल देशमुख यांनी केवळ बारा सेकंदाची ही प्रतिक्रिया दिली आहे. पण या प्रतिक्रियेमधून सरकारमधील विसंवाद पूर्णपणे समोर आलेला आहे. पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला असणार पण मग मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली नाही म्हणूनच पोलिसांच्या बदल्या रद्द करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले असतील. पण या सर्व प्रकरणातून सरकारमधील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे.

तीन पक्षाचं सरकार चालवताना सरकारमधला गोंधळ वारंवार समोर येत आहे. या आधीही या सरकारने आपले अनेक निर्णय फिरवले आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून सनदी तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं आणि त्या मागे घेणं असे निर्णय सरकार वारंवार घेत आहे. यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कामातील रस काढून घेतला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लवकरच सर्व प्रशासन ठप्प होईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

Full View

Similar News