मुख्यमंत्री साहेब, कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या - आमदार यशोमती ठाकूर 

Update: 2019-07-13 09:10 GMT

दुष्काळी परिस्थितीचा सामना करून कसा बसा संघर्ष करून जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने कर्जमुक्तीचा दिलासा दिला नाही. कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या सरकारने अमरावती जिल्ह्यातील ३०१९५ कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती दिली नसल्याने या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर व धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार विरेंद्र जगताप यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

अमरावती जिल्ह्यातील एकूण ४.१६ लक्ष शेतकरी खातेदार असून या पैकी ३.३३ लक्ष कर्जदार शेतकरी आहे. कर्ज माफी करिता १.९८ लक्ष कर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल झालेले असून यापैकी १.६८ लक्ष शेतकऱ्यांना रु ८.५३कोटी कर्ज माफीचा लाभ मिळालेला आहे. उर्वरित ३०१९५ शेतकरी अद्यापही कर्ज माफीपासून वंचित आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड केलेली आहे त्यांना रु. २५ हजार पर्यंत प्रोत्साहन योजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ३०१९५ शेतकऱ्यांना कर्ज माफीचा तसेच प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर व धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार विरेंद्र जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Similar News