पालात राहणाऱ्या नाथपंथी डवरी गोसावी कुटुंबांचे पोट 'लॉकडाऊन'

Update: 2020-04-04 16:05 GMT

आज संपूर्ण देश आज लॉकडाऊन अवस्थेत आहे. याची झळ थेट ग्रामीण भागापर्यंत पोहचलेली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्या सेवांचा लाभ ज्याच्या खिशात पैसा आहे तो घेईल. पण ज्यांचे पोट हातावर आहे त्या कुटुंबांची जगण्याची धडपड सुरू आहे. या परीस्थितीचा आढावा आढावा घेण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील विटा शहराच्या माळावर वसलेल्या झोपडीत गेलो.

या झोपड्यात भटक्या समजल्या जाणाऱ्या नाथपंथी डवरी समाजाची कुटुंबे राहतात. घरातील पुरुष पोलिस वकील डॉक्टर या सारखी रूपे घेऊन गावात फिरून कला सादर करतात. घरातील बाई खुरपणी तसेच धुणी भांडी करतात. त्यातून आलेल्या पैश्याने त्या पालातील तीन दगडांची चूल पेटते. पण कोरोनामुळे गावात भिक्षा मागणे बंद झाले आहे. शहरात मिळणारी मजुरी ठप्प आहे. अशा अवस्थेत घरातील मुलाबाळांना जगवायचं कसं असा प्रश्न या लोकांपुढे उभा आहे.

जुमराबाई शिंदे सांगतात, सकाळी दोन बिस्कीट पुडे आणले ते पोरांनी खाल्ले. थोडाफार शिल्लक तांदूळ शिजवून आम्ही चरफडत आहोत. जनाबाई सेगर सांगतात आम्हाला दुसरं कायबी नको आम्हाला जे मिळेल ते पोटासाठी द्या.

यात्रांचा काळ या समाजाचा कमावण्याचा काळ असतो. या काळातच ही वेळ आल्याने ही लोकं आता व्यथित झालेले आहेत. ग्रामीण कला टिकवून ठेवणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जतन करणारे सांस्कृतिक वारसदार आज उपाशी पोटी झोपत आहेत. त्यांना या संकटातून तरण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे.

या कुटुंबांसारखीच परीस्थिती महाराष्ट्रातील अनेक भागात झालेली आहे. अनेक पालातील चुली आज विझलेल्या आहेत. या कुटुंबांच्या जगण्याची सोय सरकारने केली पाहिजे.

Similar News