रायगड जिल्हा रुग्णालय मोजतेय अखेरच्या घटका, रुग्ण जगतात भीतीच्या छायेत

राज्यात रुग्णालयांमध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यातच रायगड जिल्ह्यातही अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या रुग्णालयात रुग्णांना अक्षरशः भीतीच्या छायेत उपचार घ्यावे लागत आहेत. याबरोबरच या रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांचा जीव धोक्यात आहे, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Update: 2022-11-28 10:38 GMT

राज्यात अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयाला आग लागून 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यातील रुग्णालयांचे भयावह वास्तव समोर आले होते. मात्र या दुर्घटनेला दोन वर्षे पुर्ण होत आले. मात्र त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयांचं धक्कादायक वास्तव बदललेलं नाही.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात 15 तालुक्यातील रुग्ण, अपघातग्रस्त, गर्भवती महिला या ठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र येथील रुग्णालयाची जुनी व जर्जर झालेली इमारत आज कोसळते की उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची भयावह दुरावस्‍था झाली आहे. भिंतींना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. स्लॅब पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रुग्णालय परिसर, भिंती व खिडक्यावर गवत-झुडपे वाढले आहे. गटारे उघडी असून दुर्गंधी पसरतेय. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या रुग्णालयाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्षच होत असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब कुटूंबांना योग्य उपचार मिळावे, यासाठी या लोकांची जिल्हा रुग्णालयावर मदार आहे. ही रुग्णालये अत्याधुनिक व सर्वंसोई सुविधांनी परिपूर्ण असणे गरजेचे असते. रुग्णालयाची इमारत मजबूत व भक्कम असावी लागते. मात्र रायगड जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय अखेरची घटका मोजत आहे. त्यातच आमच्याकडे पैसे नाहीत खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी म्हणून आम्ही नाईलाजाने सरकारी रुग्णालयात येतो. मात्र इथं भीतीच्या छायेत जगावं लागत आहे. रोजची पडछड पाहता आम्ही रुग्णाला वाचवण्यासाठी इथं आणलंय की जीव घालवण्यासाठी असा प्रश्न पडतो, अशी उद्विग्न प्रतिक्रीया रुग्णाचे नातेवाईक मिलिंद गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यातील धोकादायक स्थितीत असलेल्या रुग्णालयांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते. अलीबाग येथील रुग्णालयाचे स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर इमारत धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी वर आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत ३१ वर्षे जुनी आहे. या ठिकाणी अपघात विभाग, डायलिसिस सेंटर, एक्स-रे विभाग असून सुमारे २५० खाटांची व्यवस्‍था आहे. दिवसाला दीड हजारांहून अधिक रुग्‍ण याठिकाणी विविध उपचारांसाठी येतात. मात्र या रुग्णांच्या वाट्याला केवळ ससेहोलपट येत असल्याचे आदिवासी नेते रमेश पवार यांनी सांगितले.

यानंतर मॅक्स महाराष्ट्रने रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयातील इमारतीच्या दयनीय अवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या विभागाने तातडीने इमारतीच्या दुरुस्तीचे व समस्यांचे निराकरण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांसाठीचे रुग्णालय सामान्यांना जीव वाचवण्याचा विश्वास कधी देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News