पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत काँग्रेसचे स्पष्ट संकेत

2024 निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेसने पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असणार? याचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

Update: 2022-11-02 07:59 GMT

7 सप्टेंबरपासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) हैद्राबादमध्ये पोहचली आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यापार्श्वभुमीवर देशात गैर भाजप सरकारच्या स्थापनेसाठी नेतृत्वाबाबत चर्चा सुरु झाली आहे. मात्र यापुर्वीही तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (telangana CM KCR) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad pawar NCP),उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal), ममता बॅनर्जी (Mamata Banargee) यांची भेट घेत काँग्रेस वगळून गैर भाजप आघाडीचा प्रयत्न केला होता. त्यावरून मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) यांनी केसीआर यांच्यावर टीकास्र सोडले.

केसीआर हे पंतप्रधान मोदी यांच्याच वाटेवर जात आहेत. काँग्रेसने केसीआर यांना तेलंगणा दिला. मात्र तेलंगणातील नागरिकांवर अन्याय करण्याचे काम केसीआर करत असल्याचे खर्गे म्हणाले.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची (president of Congress) धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. यावेळी हैद्राबाद येथून मल्लिकार्जुन खर्गे यांनी केसीआर यांच्यावर टीका केली. तुम्ही जर भाजपच्या विचारांच्या विरोधात आहात. तर तुम्ही भाजपच्या विधेयकांना समर्थन का देत आहात? असा सवाल करत खर्गे यांनी केसीआर यांच्यावर टीका केली. तसेच गैर भाजप सरकार आणायचे असेल तर राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्याच नेतृत्वाखाली येईल, असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR गैर भाजप नेत्यांची आघाडी करत असले तरी काँग्रेस नेते राहुल गांधी हेच देशाचे नेतृत्व करतील, असे स्पष्ट संकेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी राहुल गांधी हेच काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रतिसाद राहुल गांधी यांना पंतप्रधान पदापर्यंत पोहचवेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


Tags:    

Similar News