वाढीव वीजबिलांनी सामान्य त्रस्त, आत्महत्येचा इशारा

Update: 2021-08-26 15:25 GMT

रायगड - कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. जगावे की मरावे असा प्रश्न अनेकांपुढे आहे. यातच आता रायगड जिल्ह्यातील काही गावातील नागरिकांना वाढीव वीज बिलांचा शॉक बसला आहे. शिहू बेणसे भागात वाढीव विजबिलांनी नागरिक हैराण झाले आहेत. शिहू येथील ग्राहक मोहन पाटील यांना तब्बल 52 हजार 350 रुपयांचे वीज बिल आल्याने त्यांना चांगलाच शॉक बसला आहे. वीज बिल भरण्यास विलंब झाल्याने त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. वीजवीतरणच्या या कारभाराला कंटाळून शेतकरी असलेल्या मोहन पाटील यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे.

मोहन पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, कोरोना काळात आम्ही नित्यनेमाने वीज बिल भरत आलो आहोत. मात्र मीटर वरून रिडींग न घेता अंदाजे विशिष्ट रक्कम ग्राह्य धरून त्यानुसार वीज बिल दिले जात आहे. सरासरी वीज बिलांच्या दुप्पट व चारपट वीज बिलाची रक्कम येऊ लागल्याने कोरोना महामारीत ही बिले कशी भरणार असा सवाल संतप्त ग्राहकांनी उपस्थित केलाय.



 

कोरोना काळात रोजगाराचे साधन नाही, खावे काय जगावे कसे, कुटुंबाला कसे जगवावे कसे याची भ्रांत पडली आहे, अशात ही वाढीव बिले व विजवीतरण विभागाकडून होत असलेला मानसिक शारीरिक छळ सहन होत नाही, त्यामुळे आत्महत्त्या करण्याशिवाय पर्याय नाही, असे इतरही नागरिकांनी यावेळी सांगितेल. वाढीव वीज बिलाची ओरड एक दोन ग्राहकांची नाही तर शेकडो ग्राहकांची असल्याचे इथले नागरिक सांगत आहेत. विजवीतरण विभागाच्या मनमानी व धाकदपटशाहीमुळे नागरिक तणावात आहेत.

यासंदर्भात आम्ही वीज वितरण कंपनीच्या पेण येथील जिल्हा अधीक्षक अभियंता गुलानी यांना संपर्क साधला तेव्हा, वीज बिलांविषय समस्या असतील तर त्यांनी त्या संबंधित कार्यालयात कळवाव्या, त्यावर अंमलबजावणी होईल. ग्राहकांनी तक्रारी अर्ज भरून दिल्यास त्यांचे समाधान केले जाईल, असे सांगितले.

Tags:    

Similar News