मोदींच्या अर्थव्यवस्थेची ट्रेन रुळावरून घसरली – राहुल गांधी

Update: 2019-08-02 14:11 GMT

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अर्थव्यवस्थेच्या मुद्यावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचबरोबर राहुल यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन अकार्यक्षम असल्याची टीका केली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची जी स्थिती आहे त्यामध्ये मंदीची ट्रेन पूर्ण वेगात येत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेवरील एक रिपोर्ट ट्विट करून भारतीय अर्थव्यवस्था रूळावरून घसरल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याचे या रिपोर्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे.

देशातील प्रमुख आठ क्षेत्रांची वाढ यंदाच्या जूनपासूनच शून्यावर स्थिरावली आहे. तेल तसेच सिमेंट उत्पादन रोडवल्याने जून २०१९ मध्ये एकूण पायाभूत क्षेत्र ०.२ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

मिस्टर पीएम, तुमची अर्थव्यवस्थेची ट्रेन रुळावरून घसरली असून बोगद्याच्या शेवटी कुठलाही प्रकाश दिसत नाही. तुमचे अकार्यक्षम अर्थमंत्री तुम्हाला प्रकाश आहे असे सांगत असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा मंदीची ट्रेन पूर्ण वेगात येत आहे, अशाप्रकारे राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

Similar News