कुरमा घर: महिलांच्या मासिक पाळीच्या खोलीचं रुप बदलतंय का?

काय आहे कुरमा घर, कशासाठी बांधली जातात कुरमा घरं? कुरमा घरांमुळं महिलांचं आरोग्य धोक्यात आलंय का? काय आहे कुरमा घराचा इतिहास? महिलांच्या आरोग्याबाबत सजग असलेल्या आदिवासींची प्रथा की महिलांचं मृत्यू घर? वाता मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा स्पेशल रिपोर्ट

Update: 2021-04-21 17:01 GMT

गडचिरोली जिल्ह्यात माडिया, गोंड या आदिवासी जमाती राहतात. या जमातींमध्ये कुरमा नावाची प्रथा आहे. कुरमा म्हणजे घराच्या बाहेर वळचणीला असलेली एक झोपडी. आदिवासी स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान यामध्ये बसवण्याच्या प्रथेला कुरमा प्रथा असे म्हणतात. याबाबत या परिसरातील नागरिक सांगतात"या काळात तिला आराम मिळावा यासाठी ही प्रथा अस्तित्वात आहे." परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या कुरमाघरातून महिलांना आराम मिळणे तर दूरच पण अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागते. बहुतेक कुरमा घरं ही निकृष्ट असतात. ज्याच्यामध्ये पाणी, पंखा, बेड स्वच्छता यांचा अभाव असतो. सांडपाण्याचा योग्य निचरा नसल्याने या ठिकाणी मच्छरांचे प्रमाण जास्त असते. डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना स्त्रियांना सामोरे जावे लागते.


कुरमा घरात सर्प दंशाच्या अनेक घटना येथे घडलेल्या आहेत. अनेकदा यामुळे महfलांचे मृत्यू देखील होत असतात.

या बाबत येथील ग्रामसभा कार्यकर्ते देवला पदा सांगतात

"कुरम्यात स्त्रियांना आराम मिळतो. मात्र, तेथील अस्वच्छता हा गंभीर प्रश्न आहे. बहुतांशी स्त्रिया sanitary pad चा वापर करत नाहीत. यामुळे लैंगिक आजार स्त्रियांमध्ये आढळतात. देवला पदा ग्रामसभा घोडेझरी च्या माध्यमातून यासंदर्भात काम करत आहेत. गावागावात या विषयावर जनजागृती त्या करत असतात.''


कुरमाघर सुधारणेची चळवळ


कुरमाघर गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात आढळतात. या भागातील नक्षलवाद्यांनी देखील या कुरमा प्रथेच्या विरुद्ध काम करण्याचा प्रयत्न केला होता. असे इथले नागरीक सांगतात.

या परिसरातील एक नागरिक नाव न सांगण्याच्या अटीवर एक जुना किस्सा सांगतात.

"एका गावात एक बाई कुरमाघरात बसलेली होती. त्यादरम्यान तिला सर्प दंश झाला. तिचा नवरा दारू प्यायला होता. गावकरी ती कुरम्यात असल्याने पुढे आले नाहीत. त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्यावर अंतिम संस्कार करायला कुणी पुढं येत नव्हतं. ही गोष्ट नक्षलवाद्यांना समजल्यावर त्यांनी तिचा अंत्यविधी केला. या घटनेनंतर या चळवळीने यावर काही काळ काम केले. त्यांनी कुरम्यातल्या स्त्रियांना गोळा करून त्यांनी केलेला स्वयंपाक इतर पुरुषांच्या तसेच गाव पुजाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावून खायला लावला. यानंतर त्यांच्या विरुद्ध जन भावना निर्माण होऊ लागली. त्यामुळे त्यांनी हे काम सोडून दिले''.

ही झाली पूर्वीची घटना परंतु आजच्या काळात देखील अशा घटना सतत घडत आहेत. दोन वर्षापूर्वी घडलेली ही घटना

१९ जुलै २०१९ या दिवशी धानोरा तालुक्यातील पोवणी टोला येथील शांताबाई नावाच्या स्त्रीचा कुर्माघरात अतिरक्त स्त्रावामुळे मृत्यू झाला होता. गर्भपातासाठी तिने गावठी औषधं खाल्ले होते. रक्तस्त्राव सुरु झाला म्हणून ती कुरमाघरात राहायला गेली. कुरमाघरात असल्याने तिच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. तिची लहान मुलगी जेंव्हा तिच्याजवळ गेली. त्याच वेळी निपचित पडलेल्या आईकडे बघून तिने हंबरडा फोडला. या नंतर शांताबाईंच्या मृत्यूची बातमी गावकऱ्यांना समजली.

ग्रामसभेने सुरू केलेली कुरमा चळवळ

कुरमा प्रथे संदर्भात ग्रामसभा काम करत आहेत. धानोरा तालुक्यातील मालंदा येथे ग्रामसभेच्या माध्यमातून कुरमा घर उभारण्यात आले आहे.

घोडेझरी ग्रामसभेच्या माध्यमातून घोडेझरी येथे आधुनिक कुरमाघर उभारले जात आहे. दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी महिला मेळावा भरतो. या दरम्यान महिलांचे आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. महिलांची प्रशिक्षणे आयोजित केली जातात. देवाजी पद्दा यांच्या मार्गदर्शनात या परिसरात आधुनिक अत्याधुनिक कुरमाघरे उभारण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात घोडेझरी येथे अत्याधुनिक कुरमा घराचे मॉडेल उभे केले आहे.


यासह ग्रामसभा मेंढा येथेही यावर काम केले जात आहे.

कुरमा प्रथा सुधारणेबाबत ग्रामसभांनी टाकलेले पाऊल हे स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. याचा परिणाम म्हणजे या भागात याची जनचळवळ होण्यास सुरवात होत आहे.

आरोग्य विभागाकडून केले जात असलेले काम

आरोग्य विभाग या संदर्भात जनजागृतीचे काम अनेक वर्षापासून करत आहे. महिलांना मासिक पाळीच्या काळात आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात आशा वर्कर तसेच इतर प्रशिक्षकांची नेमणूक करून काम केले जात आहे. पण दुर्गम भागात पसरलेला हा जिल्हा पाहता हे काम अतिशय मर्यादित आणि केवळ कागद रंगवणे इतकेच आहे. कुरमा प्रथेच्या मूलभूत ढाच्यात भौतिक सुविधांमध्ये विकास करण्याच्या कामात सरकार फारसे काम करत नसल्याचे दिसून येत आहे.

सामाजिक संघटनांनी सुरू केलेले काम

जिल्ह्यात सर्च सारख्या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्यावर मूलभूत काम केले जात आहे. यामध्ये संशोधनात्मक काम देखील केले जात आहे. स्त्रियांची जनजागृती दुर्गम गावातच उपचार अशा प्रकारे महत्त्वपूर्ण काम या संस्थेने केले आहे.

खेरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन मुंबई

आणि मुकुल माधव फाउंडेशन या संस्थांनी कुरमाघरांच्या इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात तीन गावात आधुनिक कुरमा घरे उभारली आहेत. यासाठी या संस्थेचे डायरेक्टर निकोला मोंटेरो यांनी पुढाकार घेतला आहे. या परिसरातील या संस्थेचे मास्टर ट्रेनर अमोल ठवरे यांनी पुढाकार घेत या परीसरात आधुनिक कुरमा घरे बनवण्याचे काम ग्रामसभांच्या मदतीने सुरू आहे. गावकरी या कामात श्रमदान देखील करत आहेत.

कशी आहेत आधुनिक कुरमाघरे

खराब पाण्याच्या बाटल्यांचा वापर करून बनवण्यात आलेल्या या कुरमाघरात पंखे, गाद्या, शौचालय, स्वच्छ पाणी, औषधोपचार इत्यादी सोयी करण्यात आल्या आहेत.

यासाठी गावातील व्यवस्थापन समिती नेमण्यात आली असून त्याद्वारे या कुरमाघरांचे व्यवस्थापन केले जात आहे. स्वच्छता तसेच इतर बाबींवर ही समिती कटाक्षाने लक्ष ठेवणार आहे. या कुरमाघरातील वीज ही सोलर पासून तयार केली गेली असल्याने गावात वीज नसली तरीही महिलांना त्याचा उपयोग नियमित होणार आहे.

गावातील आशा वर्कर ची या कुरमाघरात नियमित भेट होणार असून याद्वारे आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. पुढच्या टप्प्यात एका कुरमाघरात दोन शिलाई मशीन ठेवून उत्पन्न वाढीसाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.

कुरमाघरे ही आरोग्य जनजागृतीची केंद्रे व्हायला हवीत.


यासंदर्भात या संस्थेचे कार्यकर्ते अमोल ठवरे सांगतात की, हळूहळू इतर ठिकाणी कुरमाघरे विकसित करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून या कुरमाघरांमध्ये आरोग्य मार्गदर्शन डिजिटल स्वरूपात दिले जाणार आहेत. याचा परिणाम म्हणजे सध्या कु प्रथा म्हणून गणली जाणारी कुरमाघरे ही स्त्रियांच्या आरोग्याची केंद्रे म्हणून ओळखली जातील

गडचिरोली जिल्ह्यात माडिया, गोंड या आदिवासी जमाती राहतात. २०११ जनगणनेनुसार ४ लाख १५ हजार ३०६ इतकी आदिवासी लोकसंख्या आहे. यातील स्त्रियांचे प्रमाण जवळपास २ लाख ७ हजार ३७७ इतके सरासरी निम्मे इतके आहे. यातील जवळपास २५ ते ३० टक्के स्त्रिया प्रौढ आहेत. या लोकसंख्येतील ग्रामीण आदिवासी भागात राहणाऱ्या किमान २० टक्के स्त्रिया या प्रथेच्या प्रभावात येतात. ज्यांना यातील त्रास सहन करावा लागतो.

एकूण सोळाशे गावे असलेल्या या जिल्ह्यातील किमान बाराशे गावे आदिवासी आहेत. सात तालुके पूर्णतः आदिवासी आहेत. इतकी मोठी संख्या या प्रथेशी संबंधित आहे.

या प्रथेच्या सुधारणेसंदर्भात ग्रामसभांनी याचबरोबर सामाजिक संस्थांनी उचललेले पाऊल हे महत्त्वपूर्ण आहेच. पण स्त्रियांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या या प्रथेच्या सुधारणेच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात कुरमाघरांतील भौतिक सुविधांचा विकास जनजागृती आरोग्य सुविधा यावर या सरकारने या जिल्ह्यात विशेष काम करणे आवश्यक आहे.

Tags:    

Similar News