कामाच्या प्रचंड तणावाला रॅगिंग कसं म्हणायचं, संशयित आरोपी डॉक्टर्सचं स्पष्टीकरण

Update: 2019-05-27 19:56 GMT

मुंबईतल्या नायर रूग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तीनही महिला डॉक्टर्सनी मार्ड संघटनेकडं आपलं म्हणणं सादर केलंय. यात कामाच्या ताणाला रॅगिंगचं स्वरूप देण्यात आल्याचं या तीनही डॉक्टरांनी मार्डकडे सादर केलेल्या निवेदनात म्हटलंय.

२२ मे २०१९ रोजी नायर रूग्णालयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी यांनी डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. भक्ती मेहरे यांच्याकडून होणाऱ्या त्रासाल कंटाळून महाविद्यालयातील हॉस्टेलमध्येच आत्महत्या केली, असा आरोप डॉ. पायल यांच्या कुटुंबियांनी केलाय. यासंदर्भात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर या तीनही डॉक्टर फरार झालेल्या आहेत. या डॉक्टर्सनी मार्डला एक पत्र लिहून त्यात या प्रकरणासंदर्भात आपलं म्हणणं मांडलंय.

मार्डला उद्देशून या पत्रात लिहिण्यात आलंय की, आपल्याला माहितच आहे निवासी डॉक्टर म्हणून काम करतांना कामाचा प्रचंड ताण असतो आणि ताणालाच रॅगिंग म्हणणं कितपत योग्य आहे ?, असा प्रश्नच या तीनही डॉक्टरांनी उपस्थित केलाय. तीन वर्षे निवासी डॉक्टर्स म्हणून आपण सर्वजण काम करतो. या काळात रूग्णांची निगा आणि त्यांच्या जीवाला आपण सर्वजण सर्वोच्च प्राधान्य देतो, हे चुकीचं आहे का ? जर प्रचंड कामाच्या ताणाला जर रॅगिंगच नाव दिलं जात असेल तर आपण सर्वजण आपलं काम करत असतांना कुणाच्यातरी रॅगिगचा भाग झालो होतो का ? जर तसं असेल तर आपण सर्वांनी आपापल्या वरिष्ठांना (प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभागप्रमुख) आणि विभागाला दोष द्यायला हवा, असंही या पत्रात तीनही डॉक्टर्सनी म्हटलंय.

या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करून योग्य तो न्याय निवाडा करावा, अशी मागणीही या पत्राद्वारे महाविद्यालय प्रशासनाकडे या तीनही डॉक्टर्सनी केलीय. मात्र, पोलीस आणि मीडियाचा दबाव आणून अशाप्रकारे चौकशी करणं आणि त्यातही आमची बाजू न ऐकून घेता चौकशी कऱणं योग्य नाही. आत्महत्या कशामुळं केली, त्यामागचं कारण काय हे आम्हांला माहिती नाही, त्यामुळं थेट या आत्महत्या आणि अँट्रॉसिटीचा ठपका ठेवणं हा आमच्यावर अन्याय असल्याचं या तीन डॉक्टरांचं म्हणणं आहे.

आपण सोबत काम करतोय, त्यामुळं तुम्हांला वाटतंय का आम्ही रॅगिंग किंवा जातीवाचक शिवीगाळ करू ? आपण सर्वांनी आमची बाजू समजून घ्यावी आणि आम्हांला या आरोपातून न्याय मिळण्यासाठी मदत करावी, असं आवाहनही मार्ड या संघटनेला करण्यात आलंय. सध्या आम्ही प्रचंड तणावाखाली आहोत, यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही आम्हांला मदत करा, असं भावनिक आवाहनही या तीन डॉक्टर्सनी मार्डला केलंय.

Similar News