Ground Report : बौद्धवाडीचा निधी दुसऱ्या गावाला, संतप्त महिलांचा आमरण उपोषणाचा इशारा

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात घेण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. पण या योजनांचा निधी इतरत्र वापरल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात समोर आला आहे.

Update: 2022-03-24 14:22 GMT

रायगड : पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेर हलाखीचे जिणे जगणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाचा विकास व्हावा व प्रत्येक घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन त्याची सर्वांगीण प्रगती व विकास साधला जावा या उद्देशाने शासन योजना व उपक्रम राबवते जातात. मात्र अनेकदा या योजना स्थानिक पातळीवर राबविताना भेदभाव केला जात असल्याने लाभार्थी घटक विकासापासून वंचित राहतात. असाच प्रकार रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील अंतोरे बौद्धवाडीत घडला आहे. 2020-21 या वित्तीय वर्षातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीचा विकास करण्यासाठी आलेली अंतोरे बौद्धवाडी येथे रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठीची योजना प्रत्यक्षात बौद्धवाडीत न राबवता अंतोरे गावात राबवली गेली आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.




 

या रस्त्यासाठी तब्बल दोन लाख अठयाण्णव हजार नऊशे नव्वद रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे. अंतोरे बौद्धवाडी अंतर्गत रस्त्यासाठी निधी फक्त नावाला आला पण प्रत्यक्षात रस्त्याचा लाभ अंतोरे गावाला झाला, अशी परिस्थिती दिसून येत आहे. या प्रकारानंतर अंतोरे बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र बौद्धवाडीच्या नावाने निधी इतरत्र खर्ची करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला. अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीसाठी आलेली योजना राबविताना ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते मात्र आम्हाला याबाबत विश्वासात घेतले नसल्याचे महिलांनी म्हटले आहे.


 



अंतोरे बौद्धवाडी अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण या कामासाठी 2 लाख 99 हजार प्रमाणे जिल्हा समाज कल्याणअधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडून मंजुरी देण्यात आली. या कामासाठी 90 टक्केप्रमाणे रक्कम 2 लाख 60 हजार निधी गटविकास अधिकारी पंचायत समिती पेण यांच्याकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार या कामाबाबत शाखा अभियंता पंचायत समिती पेण यांनी बौद्धवस्तीत येऊन लाईनआउट देण्याचे काम केले. प्रत्यक्षात मात्र हा निधी बौद्धवस्तीत न वापरता इतर वस्तीत वापरला गेला आहे, व त्याठिकाणी केलेल्या कामाची कोनशीला (नामफलक)अनुसूचित जाती नवबौद्ध वस्तीचा विकास करणे अशी लावलेली आहे, अशी तक्रार येथील महिला व ग्रामस्थांनी केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी येथील ग्रामस्थांनी केलीय.



 



बौद्धवाडीत रहदारीच्या व पायवाट असलेल्या अनेक ठिकाणी पावसाळ्यात गवत वाढते, चिखल होतो, पाण्यासाठी व शौचालयासाठी जाण्यासाठी येण्यासाठी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. अशा ठिकाणी अंतर्गत रस्त्यासाठी निधी वापरणे गरजेचे असताना हा निधी परस्पर इतर गावात वापरला गेला असल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत.

यासंदर्भात अंतोरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रवीण पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "अंतोरे बौद्धवाडी अंतर्गत रस्त्यासाठी 2 लाख 98 हजार 990 इतका निधी उपलब्ध झाला आहे. तसेच हा निधी खर्च करण्यात आला आहे. अंतोरे गावालगत तीन चार नवबौद्धांची घरे आहेत. त्यामुळे याठिकाणी सदर निधींद्वारे सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता केला आहे. अंतोरे बौद्धवाडीतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार अंतर्गत रस्त्यांची कामे करून घेऊ," असे सांगत ग्रामसेवकाने आपली जबाबदारी झटकून लावली आहे.


Full View

Tags:    

Similar News