या गावाने जपलीय बाबासाहेबांच्या आठवणीतील बैलगाडी

धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढलेली बैलगाडी आजही जीवापल्याड जपली आहे. काय आहेत या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी वाचा अशोक कांबळे यांचा विशेष रिपोर्ट....

Update: 2023-11-29 05:43 GMT

“२२ फेब्रुवारी १९४१ साली याच गाडीत बाबासाहेब बसले होते. आमच्या कसबे तडवळे गावातील लोकांनी बैलगाडीत बसवून बाबासाहेबांची मिरवणूक काढली होती. जयंती उत्सवात या गाडीला वंदन करण्यासाठी लोक जमा होतात. ही बैलगाडी आमची अस्मिता बनली आहे. बाबासाहेब ज्या गाडीत बसले त्या गाडीला लोक इतके मानतात मग बाबासाहेबांना किती मान देत असतील”?

धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे गावात राहणाऱ्या अच्युत भालेराव यांची ही प्रतिक्रिया आहे. तत्कालीन मोगलाई मराठवाडा येथे महार मांग परिषद घेण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मनोदय होता. कसबे तडवळे येथील निमंत्रणाने त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं. तत्कालीन मोगलाई मराठा येथे परिषद घेण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनाई होती. या परिषदेच्या निमित्ताने या परिसरातील जनतेसोबत संवाद करण्याची संधी बाबासाहेबांना मिळाली होती. या परिषदेसाठी गावातील जुन्या शाळेचे शिक्षक हरिभाऊ तोरणे गुरुजी यांनी पुढाकार घेतला होता. या परिषदेत बाबासाहेबांनी जनतेला उद्देशून भाषण केले होते. या भाषणातून त्यांनी समाजाला मृत जनावरांच्या मांसाचे सेवन करू नये, शिक्षण घ्यावे, गावकी सोडून द्यावी असे आवाहन केले होते. या परिषदेच्या दरम्यान त्यांनी विविध जाती समुदायाची प्रतिनिधींशी संवाद साधत अस्पृश्यता निर्मुलनासाठी त्यांनाही आवाहन केले होते. कसबे तडवळे या गावात देखील ब्राम्हण, मारवाडी, मराठे यासह इतर समाजाच्या बैठका त्यांनी घेतल्या होत्या.





महार मांग परिषदेला उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर 




महार मांग परिषद देणगी पावती


 



महार मांग परिषदेची कार्यक्रम पत्रिका


या परिषदेसाठी बाबासाहेब कळंब रोड या रेल्वे स्थानकावर उतरले होते. बाबासाहेबांचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. पारंपारिक वाद्ये वाजवत लोकांनी बाबासाहेबांचे स्वागत केले. कळंब रोड रेल्वे स्थानक ते कसबे तडवळे या गावापर्यंत बाबासाहेबांची मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात आली होती. विशेष म्हणजे या बैलगाडीला तब्बल ५१ बैल जुंपण्यात आले होते. सर्वात पुढील ५१ वा बैल अच्युत भालेराव यांच्या वडिलांचा होता. त्यांच्या वडिलांनी या मिरवणुकीच्या सांगितलेल्या आठवणी त्यांच्या डोळ्यापुढे आजही उभ्या राहतात. ते सांगतात “ बाबासाहेबांच्या मिरवणुकीसाठी तब्बल २५ बैलजोड्या जुंपण्यात आल्या. या बैलजोड्यांच्या पुढे आणखी एक शिवाळ लावलं होतं. सर्वात समोरच्या शिवाळाला जुंपलेला बैल माझ्या वडिलांचा म्हणजे काशीनाथ धोंडी भालेराव यांचा होता. त्या गाडीत बाबासाहेब बसले. लोकांनी त्यांना वाजत गाजत गावात आणले.”




ज्या कळंब रोड रेल्वे स्थानकावर बाबासाहेब उतरले त्या स्थानकाबाहेरील पिंपळ वृक्ष


ज्या बैलगाडीतून बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आलेली होती. ती बैलगाडी किशोर डाळे यांची होती. बाळू गणपत माळी यांच्यात बटईने शेती करत होते. शेती सोडल्यानंतर बाळू माळी यांचे काही पैसे किशोर डाळे यांचेकडे राहत होते. या पैशांऐवजी त्यांनी या बैलगाडीची मागणी केली. अशा प्रकारे त्यांना ही बैलगाडी मिळाली. तेंव्हापासून म्हणजे १९९० पासून ते या बैलगाडीचे जीवापल्याड संगोपन करतात. बाबासाहेब ज्या बैलगाडीत बसले होते ती बैलगाडी पाहण्याचे अनेकांना कुतुहूल असते. बैलगाडी पाहण्यासाठी देशभरातून लोक या गावात येतात. जयंती उत्सवासाठी बैलगाडी घेऊन जातात.




डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढण्यात आलेली बैलगाडी


कसबे तडवळे या गावातील अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या विविध आठवणी आहेत. ज्या जागेवर ही परिषद पार पडली त्या ठिकाणी त्या काळातील लोकांनी पै पै जमा करून पैसे भरलेली थैली बाबासाहेबांकडे सुपूर्द केली होती. या ठिकाणी असलेल्या वाचनालयास भेट देऊन बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षरात अभिप्राय देत स्वतःची सही देखील केली होती. बाबासाहेबांचा हा अभिप्राय येथील कार्यकर्त्यांनी आजपर्यंत जपून ठेवला आहे.




कसबे तडवळे येथी वाचनालयाला दिलेल्या भेटीनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सहीनिशी दिलेला अभिप्राय


महार मांग वतनदार परिषदेला जमलेल्या लोकांची संख्या इतकी मोठी की परिसरात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याची आठवण जुन्या लोकांनी सांगितल्याचे येथील वृद्ध व्यक्ती सांगतात.

गावातील अशीच एक वृद्ध व्यक्ती जुन्या लोकांनी सांगितलेली पुढील आठवण सांगतात “ एवढी लोकं आली होती की आडाला सुद्धा पाणी नव्हतं, विहिरी देखील आटल्या होत्या, जुन्या लोकांनी हे सांगितलेलं आहे. मी तेंव्हा जन्मलेलो नव्हतो. आई वडलांनी आम्हाला सांगितलेली ही गोष्ट आहे.



 जुन्या लोकांनी सांगितलेली आठवण 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशभरात फिरून अस्पृश्यता निर्मुलनाचे काम करत होते. त्यांच्या जीवाला त्यावेळी धोका देखील होता. यासाठी त्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी कार्यकर्ते पार पाडत होते. इतकच काय पण त्यांना देण्यात येणारे जेवण देखील डॉक्टर कडून तपासण्यात येत होते. त्यांच्या जेवणासंदर्भातील असाच एक किस्सा कसबे तडवळे येथील नागरिक अच्युतराव भालेराव सांगतात “ परिषद संपल्यावर बाबासाहेब शाळेत विश्रांतीसाठी गेले. त्यावेळी बापा नावाच्या सोलापुरातील व्यक्तीने त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला होता. सोलापूरच्या वळसंगकर नावाच्या डॉक्टरांनी ते जेवण तपासले. तपासल्यानंतरच हे जेवण बाबासाहेबांना देण्यात आले.”



जुन्या लोकांनी सांगितलेली आठवण

कसबे तडवळे या गावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पद स्पर्श झालेल्या सर्व आठवणी जीवपल्याड जपल्यात. परंतु बाबासाहेब ज्या रेल्वे स्थानकावर उतरले जेथून त्यांची मिरवणूक निघाली ते कळंब रोड रेल्वे स्थानक आज बंद अवस्थेत आहे. त्याची पडझड झाली आहे. या स्थानकावर आज रेल्वे थांबत नाही. सरकार या स्मृती जपण्यामध्ये अपयशी ठरले आहे. या रेल्वेस्थानकावर पुन्हा रेल्वे थांबवण्यात यावी तसेच या स्टेशनवर बाबासाहेबांच्या स्मृती जपाव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थ अनेक वर्षापासून करत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त सरकारने कसबे तडवळे गावातील या स्मृती स्थळाला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला. या ठिकाणी भव्य स्मारक उभारत त्यांच्या स्मृती जपण्याच्या घोषणा दिल्या गेल्या. पण आजपर्यंत ही घोषणा पूर्णत्वास आलेली नाही. स्मारकासाठी निधी उपलब्ध झाला. परंतु या ठिकाणी असलेल्या शाळेचे काय असा प्रश्न निर्माण झाला. या शाळेला पर्यायी जागा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत मिळाली. शाळेच्या बांधकामासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला. पण अद्याप कागदी घोडे नाचवण्यापलीकडे स्मारकाचे काम पुढे गेलेले नाही. बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याची सरकारची इच्छाच दिसत नसल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या गाडीत बसले, त्यांनी ज्या ज्या ठिकाणांना भेटी दिल्या त्या सर्व स्मृती येथील स्थानिकांनी जीवापल्याड जतन करून ठेवल्या आहेत. सरकारने या गावात स्मृती स्थळ उभारून बाबासाहेबांच्या स्मृतींचा ठेवा पुढच्या पिढ्यांपर्यंत जतन करावा यासाठी येथील नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली. पण अद्याप पर्यंत हे स्मृती स्थळ उभा राहिलेले नाही. कागदी घोड्यात अडकलेले हे स्मारक उभारण्यासाठी सरकार पुढाकार घेणार तर कधी असा सवाल करत या ग्रामस्थांनी ‘जय भीम’ चा नारा देत पुन्हा संघर्षाची तयारी सुरु केली आहे. या महापरीनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सरकार आता तरी या प्रश्नाची दखल घेणार का हे येत्या काळातच कळेल...

- शब्दांकन सागर गोतपागर


Full View


Tags:    

Similar News