डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवणार 

Update: 2019-06-21 14:08 GMT

दादरमधील इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यामुळे आता पुतळ्याची उंची एकूण ४५० फूट होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळ्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्याची माहिती दिली. तसंच २०२० पर्यंत पुतळ्याचं काम पूर्ण होईल, असे सांगितले. इंदू मिलमधील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच स्मारकात ग्रंथालय, ई-लायब्ररी विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहे.

इंदू मिल येथे आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. तेथील झाडे तोडण्याची महापालिकेची परवानगी मिळविण्यात आली असून जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात येत आहे. समुद्राचे पाणी इंदू मिलमध्ये येऊ नये, यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचेही काम करण्यात येत आहे. स्मारकासाठी ७४३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिलमध्ये उभारण्यात येणारा पुतळा चीनमध्ये तयार करण्यात येत आहे. पुतळ्याचे सुटे भाग मुंबईत आणून जोडले जातील, अशी माहिती पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार यांनी दिली होती.

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने कमी करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. तसंच चौकशी केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू , असा इशारा दिला होता.

Similar News