बेळगावात पुन्हा कानडी दादागिरी, मराठी बांधवांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली

Update: 2021-10-12 12:16 GMT

बेळगाव - कर्नाटक- महाराष्ट्र सीमालढ्याचे केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव शहरात १ नोव्हेंबर हा दिवस सीमाभाग महाराष्ट्रापासून तोडून कर्नाटकात घेतला गेल्याच्या निषेधार्थ "काळा दिवस" म्हणून पाळला जातो. गेल्या सहा दशकात यात कधीही खंड पडला नाही आणि सनदशीर मार्गाने मूक फेरी काढून सीमावासीय मराठी जनता आपला निषेध व्यक्त करत आली आहे. पण कोरोना संसर्ग रोगाचे कारण पुढे करत बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी नाकारली आहे. 



 


जिल्हाधिकारी कार्यालयात कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी कन्नड संघटनेच्या प्रतिनिधींनी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला काळया दिनाची परवानगी देऊ नये तसेच मराठी लोकांवर दमदाटी करण्याऱ्या पालिका अधिकारी यांचा आदर्श बाकीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी मागणी केली. पण याचवेळी कोरोना नियमांचे पालन करत कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जावा अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.  



 


सीमाभागातील मराठी लोक काळा दिवस हा मराठी माणसावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ पाळतात. तो दिवस का कन्नड लोकांना डिवचण्यासाठी नसतो याचा विसर कन्नड सघंटना आणि कर्नाटक प्रशासनाला कायम पडतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आता कोणता निर्णय घेणार याकडे सीमावासीय मराठी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags:    

Similar News