राज्यभरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे बार्टी कार्यालयाबाहेर उपोषण

सामाजिक न्याय विभागाच्या सारथी आणि महाज्योती संस्थेला एक न्याय आणि बार्टीला एक न्याय हा दुजाभाव कशासाठी? असं सांगत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी पार्टी कार्यालयाच्या बाहेरच आमरण उपोषण सुरू केले आहे. याविषयी प्रतिनिधी गौरव मालक यांचा ग्राउंड रिपोर्ट...

Update: 2022-11-02 08:31 GMT

मागासवर्गीय समाजातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच संशोधक विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. याच अनुषंगाने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी (BARTI) कडून विद्यापीठ अनुदान आयोग (ugc) या धर्तीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन 'अभी छात्र वृत्ती' ही शिष्यवृत्ती दिली जाते.

2013 पासून ही शिष्यवृत्ती दिली जात आहे. बार्टी अंतर्गत एकूण 880 संशोधक विद्यार्थी आहेत. मात्र यावर्षी या विद्यार्थ्यांमधून या शिष्यवृत्तीसाठी (student Scholarship) केवळ 200 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. याकरिता या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. 880 विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थी निवडल्यानंतर बाकी विद्यार्थ्यांनी काय करायचं? असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

सारथी (Sarathi)आणि महाज्योती (Mahajyoti) या संस्थांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट ही शिष्यवृत्ती दिली जाते. मग आम्हाला का नाही? असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने संशोधनाचा खर्च परवडणारा नाही. दुसरीकडे शासन आम्हा विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करत आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया रद्द करून सरसकट शिष्यवृत्ती दिली जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.

मॅक्स महाराष्ट्रने (Max Maharashtra) या संदर्भात विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी बार्टीचे उपसंचालक उमेश सोनवणे (Umesh sonawane) यांना या संदर्भात विचारणा केली.

यावेळी उमेश सोनवणे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणारे निवेदन दिले आहे. शासनाने यावर विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. बार्टीकडून विद्यार्थी हितासाठी कायम सहकार्य केले जाईल, अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली.

Full View

Tags:    

Similar News