Ground Report : आदिवासी बांधवांची पायपीट, रस्ते कागदावरच

Update: 2021-09-28 02:35 GMT

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना डिजिटल इंडियाचा ढोल बडवले जात आहेत. पण नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात अजूनही साधा रस्ता देखील मिळू शकलेला नाही, आजही एका गावाहून दुसऱ्या गावात जाण्यास पायीच जावे लागते. संपूर्ण आदिवासी तालुका असलेला धडगाव तालुका सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला आहे. 



 


ह्याच तालुक्यातील धडगावहून मांडवी आणि मांडवीहुन रूणमालपाडा येथे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रस्ता अतिशय कच्चा आहे. मांडवी रूणमालपाडाला गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरून नदी वाहते. नदीत सहा महिने वाहती असते. पावसाळ्यात तर पूराचं पाणी ओसंडून वाहते. अनेक वर्षापासून नदीवर पुलाची मागणी केली जाते. मात्र पूल काही होत नाही, ना येथ लोकप्रतिनिधी येतात ना प्रशासन दखल घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे.



 


येथील आदिवासींना रस्त्याअभावी नदीच्या पात्रातून दगड गोटे तुडवत, खडतर डोंगराळ भागातून जीव मुठीत धरून पायपीट करावी लागत आहे. गावाला तालुक्याशी जोडणाऱ्या रस्त्याची सोय करून डांबरीकरणाची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातील रुणमालपाडा हे सुमारे चौदाशे लोकसंख्येचे गाव आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा व अंगणवाडी केंद्र आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. यापुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तसेच वैद्यकीय उपचारासाठी व बाजारासाठी ग्रामस्थांना जवळील मांडवी धडगाव गाठावे लागते. यासाठी मांडवी येथून पुढील प्रवास सुरु करावा लागतो. मात्र, मांडवी ते रुणमालपाडा ह्या चार किलोमीटरच्या रस्त्याअभावी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.



 


वाटेत नदी असल्याने नदीला पूर आलेला असल्यास नागरिकांना जीव मुठीत घेवून सामानासह त्यातून रस्ता काढावा लागतो. त्यातच महिला, अबालवृद्धांची यात दैना पाहायला मिळते. काहीवेळा पुराच्या पाण्यात काही जण वाहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटना घडत असल्याने आदिवासींच्या मनात संतप्त भावना आहेत. केवळ चार किलोमीटरच्या रस्त्याअभावी ग्रामस्थांना वर्षानुवर्षं अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.




 


रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा निवेदने देवूनही काहीच झालं नाही. रुणमालपाडा ते मांडवी हा चार किलोमीटरचा रस्ता दळणवळणाच्या सुविधेसाठी तयार करण्याची मागणी संबंधित विभागाकडे अनेकवेळा निवेदने व अर्ज देवून केली. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे इथले लोक सांगतात. प्रशासनाने चारचाकी अंबुलन्स येऊ शकत नसल्याने मोटारसायकल अंबुलन्सची व्यवस्था केली आहे. मात्र रस्ताच नसल्याने मोटारसायकल अंबुलन्सही पोहचत नसल्याचं ग्रामस्थ सांगतात.

Tags:    

Similar News