भाजपचा कोणता नेता महाविकास आघाडीच्या रडारवर?

Update: 2022-04-01 15:03 GMT

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांविरोधात गृहमंत्रालयाकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचा कोणता नेता महाविकास आघाडीच्या रडारवर असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच राष्ट्रवादीकडे गृहमंत्रालय असून गृहमंत्र्यांकडून कारवाई केली जात नसल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी गृहमंत्र्यांवर दबाव टाकायला सुरूवात केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपचा नेत्यावर कारवाई केली जाणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस, मोहित कुंबोज, प्रविण दरेकर, किरीट सोमय्या यांच्या विरोधातील पुरावे असतानाही महाविकास आघाडीकडून कारवाई केली जात नसल्यामुळे शिवसैनिकांत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल नाराजी आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस, मोहित कुंबोज, प्रविण दरेकर, किरीट सोमय्या हे भाजप नेते महाविकास आघाडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

याबरोबरच सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यालयाने महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र केंद्रीय तपास यंत्रणांना जशाच तसे उत्तर देण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपच्या नेत्यांवर कारवाईचा फास आवळण्याची रणनिती महाविकास आघाडीत ठरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:    

Similar News