MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी Live करा

सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी सोमवार पासून घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र ही सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपित घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Update: 2023-09-23 05:51 GMT

आमदार अपात्रता प्रकरणी 14 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 18 सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा का करत आहेत? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारपासून सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र ही सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे घेण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या बंडखोरी प्रकरणी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आपल्याकडे सुरू असलेल्या कार्यवाहीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकशाही आणि न्यायप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे. या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवून आपण या प्रकरणी न्यायनिवाडा करावा, असे निर्देशित केले आहे.

त्या अनुषंगाने बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार हे देखील महाराष्ट्राला कळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील राजकारणाच्या ढासळत्या दर्जामुळे राज्यातील नागरिकांमध्ये एकंदर राजकीय व्यवस्थेबाबत नकारात्मकता निर्माण झाली असून हे लोकशाहीच्या हिताचे नाही.

विधानसभा अध्यक्ष या नात्याने आपण एका संविधानिक पदावर विराजमान असून या प्रकरणाबाबत आपण कसा न्याय देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या पार्श्वभुमीवर संविधानिक संस्था, संविधानिक पदं आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे.

आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पारदर्शक व्हावी म्हणून या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Tags:    

Similar News