जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार - राज ठाकरेंचा पुनरोच्चार

``पुन्हा सांगतोय हा सामाजिक विषय आहे, तुम्ही धार्मिक कराल तर आम्हीही धार्मिक उत्तर देऊ असा पुनरोच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परीषदेत केला``.

Update: 2022-05-04 08:33 GMT


राज्यभर हनुमान चालिसा विरुध्द अजान असा पध्दतीने आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला होता. पोलिसांचे सातत्याने फोन येत होते असे राज ठाकरे म्हणाले. मुंबईत ११४० मशिदी असून त्यापैकी १३५ मशिदींवर पाच वाजण्याच्या आधी अजान लावण्यात आली. विश्वास नांगरे पाटील यांनी फोन करुन सर्वांशी चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. मग या मशिदींवर कारवाई होणार की फक्त आमच्या मुलांनाच उचलणार आहात. सामंजस्याने हाताळला तर हा विषय सर्वांचा आहे. आमच्यामुळे ९२ टक्के अजान झालं नाही असं आमचं म्हणणं नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रभरातून आणि बाहेरुनही आम्हाला फोन येत होते. पोलिसांचेही फोन येत आहेत. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत. पण हे फक्त आमच्या बाबतीत का होत आहे? जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देणार आणि करत नाही त्यांना मोकळीक देणार अशा शब्दांत राज ठाकरेंनी यावेळी टीका केली.

तुम्हाला माइक आणि स्पीकर कशाला लागतो? कोणाला ऐकवायचं आहे तुम्हाला?. हे भोंगे उतरवले पाहिजेत. जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे. आज अजान लावली नाही म्हणून आम्ही खूश होणार नाही. हनुमान चालिसा वाजत राहणार. हा सामाजिक विषय आहे. पण जर त्यांनी धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ असा धमकीवजा इशारा राज ठाकरेंनी दिला.

"औरंगाबादच्या सभेदरम्यान अजान सुरु झाली. मी पोलिसांना बंद करण्यासाठी विनंती केली. ते भडकवायचं असतं तर तिथे काय झालं असतं मला सांगा. आम्ही शांततेत समजावून सांगतोय ती समजून घ्यावं," असं राज ठाकरे म्हणाले.

आमच्या लोकांची धरपकड कशासाठी करताय? मोबाइलच्या काळात, संवादाची साधने एवढी असताना माणसं पकडून काय होणार. हे अजून ६०-७० दशकांचा विचार करताय का?एवढा मुर्खपणा… हे कोणत्या काळात जगतायत माहिती नाही, अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी केली.

महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांना हेच सांगायचंय ही हा एका दिवसाचा विषय नाही. हनुमान चालिसाशिवाय समजणार नसेल तर दुप्पट आवाजात वाजवा. मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस काय कारवाई करणार हे एकदा समजू दे. ते धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही रहावं लागेल. ३६५ दिवस दिवसभरात चार, पाच वेळा लावणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय. यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे का? पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजेत. जी प्रार्थना करायची ती मशिदीत करा," असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

दिवसभर जी काही चार-पाच वेळा बांग दिली जाते त्यांची प्रार्थना म्हणतात ती जर परत त्यांनी दिली तर आमची लोकं त्या त्या वेळा हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचं पालन करावं लागेल. लोकवस्तीमध्ये ४५ ते ५५ डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि यांना ३६५ दिवस परवानगी देता ती कशासाठी? ४५ ते ५५ डेसिबल म्हणजे आमच्या घरचे मिक्सर जेवढे वाजतात तेवढा आवाज असं राज ठाकरे म्हणाले.हा एक दिवसाचा विषय नाही. ४ तारीख पकडू नका. जोपर्यंत विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार, असं राज ठाकरेंनी शेवटी स्पष्ट केलं.

Tags:    

Similar News