ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनी मध्ये फरक; दरेकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Update: 2020-11-16 16:22 GMT

अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती.मात्र, प्रत्यक्षात ही मदत मिळालीच नसल्याचा आरोप करत विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारच्या करणी आणि कथनी मध्ये फरक असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

राज्यातील अनेक भागात शेवटच्या टप्प्यात अपेक्षा पेक्षा अधिकचा पाऊस झाला होता. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी दिले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ही मदत मिळाचीच नसल्याचा आरोप होत आहे. तर यावरूनच आता विरोधी पक्षाकडून सुद्धा टीका केली जात आहे.


यावर प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत, "राज्य सरकार फक्त घोषणा करतं, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यांच्या करणी आणि कथनी मध्ये फरक असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

तर राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर सरकारच्यावतीने १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचे सांगितले. त्यातील २ हजार कोटी रुपये दिवाळीच्या आधी देण्यात येतील, असे जाहीर केले. परंतु शेतकऱ्यांना ही मदत अजूनही मिळाली नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.


महाविकास आघाडी सरकार फक्त घोषणा करत आह, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.निसर्ग वादळाबाबत कोकणात घोषणा केल्या, पण आजही मदत मिळाली नसून लोकांचा आक्रोश सुरू आहे.अतिवृष्टीबाबतीत आम्ही दौरे, पाहणी करून सरकारवर दबाव आणला. त्यानंतर सरकराने राणा भीमदेवी थाटाप्रमाणे 10 हजार कोटींची घोषणा केली.दिवाळीला 2 हजार कोटी देण्याचं सांगितलं,मात्र आजही या क्षणाला अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडाला पाने पुसण्याचं काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

Tags:    

Similar News