बजरंग सोनवणेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर? ज्योती मेटे अपक्ष लढणार का?

Update: 2024-04-05 06:30 GMT

लोकसभा निवडणुकीची राज्यामध्ये रणधुमाळी चालू आहे आणि याच रणधुमाळी मध्ये महायुतीने पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर अनेक दिवस महाविकास आघाडीच्या उमेदवाराची वाट पहावी लागली आज काही वेळापूर्वी बजरंग सोनवणे यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी घोषणा केलीय, बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्षपदी अनेक दिवस होते. या अगोदर बजरंग सोनवणे यांनी 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधामध्ये लोकसभा लढवली होती त्यामध्ये त्यांना 6 लाख 78 हजार मतदान पडले होते, तर प्रीतम मुंडे यांना 5 लाख 9 हजार मतदान पडले होते. मात्र प्रीतम मुंडे या राज्यासह देशात सर्वाधिक मताने निवडून आलेल्या उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं.

राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात राजकारणात ढवळाढवळ झाल्यानंतर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात प्रवेश करून पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत, तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपची अनेक मंडळी नाराज आहेत, कारण प्रीतम मुंडे यांनी दोन टर्म खासदारकी भोगली आहे, त्यातच बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी अनेक सभा घेतल्या त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील सर्व मराठा समाजाला एकत्र करत आहेत, मात्र त्यांनी लोकसभेला उमेदवार देणार, असं त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिला नाही तर दुसरीकडे बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून अनेक उमेदवार रिंगणात उतरवले होते, त्यामध्ये ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळणार होती अशी चर्चा प्रसार माध्यमावर आपण पाहिली, मात्र शरद पवार यांचे धक्कातंत्र आपण अनेक वेळा पाहिले आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांना उमेदवारी न देता बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे.

आता, इतर उमेदवार असलेले जयसिंग गायकवाड, ईश्वर मुंडे, नरेंद्र काळे, सुशीला मोराळे यांना शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं होतं की, तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ मात्र, आता काही वेळापूर्वी बजरंग सोनवणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली, यामुळे बाकी सर्व उमेदवारांच्या उमेदवारीला पूर्णविराम मिळाला आहे, त्यामुळे आता बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे हा संघर्ष पाहायला मिळणार आहे, तर बीड जिल्ह्यातून काही अपक्ष उमेदवार उभा राहतील का हे सुद्धा पाहणं औचित्याचे ठरणार आहे, कारण ज्योती मेटे या स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत.

विनायक मेटे यांनी देखील मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभा केले आणि अखेरीस मराठा आरक्षणाच्या बैठकीस जात असतानाच त्यांचं अपघाती निधन झालं त्यामुळे मराठा समाज ज्योती मेटे यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभा करतील का? की बजरंग सोनवणे यांना मदत करतील? त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळाला होता, त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळणार का? आणि मतदारांचा कौल कोणाला असणार? हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.

Similar News