राष्ट्रपती राजवट लावायची तर उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी लावा- संजय राऊत

Update: 2022-04-25 08:34 GMT

शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी जोर धरू लागली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी लावण्याची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. त्यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी म्हटले की, किरीट सोमय्यांच्या दाढीला थोंडासा ओरखडा निघाला आणि त्यातून रक्त आलं म्हणून कोणी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेत असेल तर ती हास्यास्पद आहे. तसेच भाजपच्या लोकांना काही कामं नाहीत. त्यामुळे भाजपचे लोक दिल्लीत जातात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

दिल्लीत जाऊन महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर बोलणारे महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि भाजपच्या शिष्टमंडळावर केला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, जर त्यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे वाटत असेल तर त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला हवी होती. मात्र काहीही झालं की हे लगेच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतात, असा टोला राऊत यांनी लगावला.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची केली. याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्हीही राज्यात लावा. कारण उत्तरप्रदेशात गेल्या तीन महिन्यात 17 मुलींवर बलात्कार आणि त्यांची हत्या झाली आहे. त्यामुळे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असे वाटणाऱ्यांनी उत्तरप्रदेशातही राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी. जर उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लावणार असाल तरच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

संजय राऊत यांनी केले योगींचे कौतूक संजय राऊत म्हणाले की, उत्तरप्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ चांगले काम करत आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांचेही चांगले काम आहे. त्यामुळे उगीच राष्ट्रपती राजवटीच्या नावाने गळा काढू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत यांच्याकडून मुंबई पोलिस आयुक्तांची पाठराखण किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिस आयुक्त हे उध्दव ठाकरे यांच्या इशाऱ्यानुसार काम करतात, असा आरोप केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे हे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यामुळे अशा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी करू नये.

Full View

Tags:    

Similar News