ट्राफिक जाम मध्ये अडकलेल्या राज ठाकरेंचा टोल कर्मचाऱ्यांना पुन्हा हिसका

नाशिक दौरा आटपून मुंबईकडे निघालेल्या राज ठाकरे यांना आनंदनगर टोल नाक्यावर कोंडीचा सामना करावा लागला,यावेळी राज ठाकरे यांनी गाडीतून उतरून कोंडीत अडकलेली वाहने सोडायला लावली.

Update: 2024-02-02 22:21 GMT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत असतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत टोलनाक्यांवर होणारी अतिरिक्त वसुली आणि नियमांची मोडतोड, याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र अजूनही टोलनाक्यांवर नियमांची पायमल्ली होत असून आज याचा अनुभव स्वतः राज ठाकरे यांनाच मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील आनंदनगर टोल नाक्यावर आला. यावेळी राज ठाकरे यांनी कोंडीत अडकलेल्या वाहनांना विना टोल पुढे सोडण्यास प्रशासनाला भाग पाडले. तसेच टोल प्रशासनाची खरडपट्टी काढली.


 



नाशिक येथील पदाधिकाऱ्यांचा दौरा आटपून मुंबईकडे परतणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी हजेरी लावली. त्यानंतर मुंबईकडे निघालेल्या राज ठाकरे यांना आनंदनगर टोल नाक्यावर कोंडीचा सामना करावा लागला. यावेळी ठाकरे यांनी वाहनामधून उतरून टोल प्रशासनाला समज दिला. तसेच कोंडीमध्ये अडकलेल्या वाहनांना विना टोल सोडण्यास सांगितले.

गेल्या महिन्यात खालापूर टोल नाक्यावर देखील राज ठाकरे यांनी अशाच पद्धतीने टोल प्रशासनाला कोंडीमुळे धारेवर धरले होते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. यावेळी राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश अभ्यंकर उपस्थित होते.

ठाकरे यांचा रुद्रावतार पाहून टोलनाक्यावरील वाहने विना टोल पुढे सोडण्यात आली. या टोल नाक्यावरील वसुली विरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते. या आंदोलनाला खुद्द राज ठाकरे यांनी भेट दिली होती. मात्र अद्याप या टोल नाक्यावर सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहन चालक हैराण होत आहेत.



Tags:    

Similar News