राहुल गांधीं, ठाकरे व सावरकर....

मागील काही दिवस सावरकर या विषयाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे आणि हा विषय मविआलाच धोक्यात आणू शकतो का यावर विश्लेषण केला आहे लेखक रमेश सांगळे यांनी..

Update: 2023-03-27 10:42 GMT

मागील काही दिवस सावरकर या विषयाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे आणि हा विषय मविआलाच धोक्यात आणू शकतो का यावर विश्लेषण केला आहे लेखक सुनिल सांगळे यांनी..

इतिहास काहीही असो, केवळ "माझी जन्मठेप" हे एकच पुस्तक वाचल्याने लहानपणी भारावून गेलेले लाखो लोक महाराष्ट्रात आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी त्यानंतर काहीच न वाचल्याने, आणि आता ते लोक सावरकरांच्या विरुद्ध काहीही ऐकून घेण्याबाबत denial mode मध्ये गेलेले असल्याने, त्यांचे मतपरिवर्तन करणे अशक्य आहे. हे आपण सध्याच्या नेत्यांच्या भक्तीबाबतही रोज बघत असतो.

राहुल हे देशपातळीवरील नेते असल्याने, सावरकरांच्या बाबत काहीही बोलणे त्यांना परवडू शकते, कारण त्यांच्या दृष्टीने सावरकर हे हिंदुत्ववाद्यांचे ideologue आहेत आणि त्यांचे मूर्तिभंजन करणे त्यांना आवश्यक वाटत असावे.

शिवसेनेचे तसे नाही. सेनेच्या हिंदुत्वाचा इतिहास थोडा वेगळा आहे. १९८० नंतर सेनेच्या नैसर्गिक वाढीवर मुंबईत मर्यादा आल्या, कारण मुंबईतील मराठी टक्का कमी झाला होता. तेंव्हा मुंबईत अस्तित्व टिकवण्यासाठी अमराठी मते मिळवणे सेनेला आवश्यक झाले होते. ती मते आकर्षित करण्यासाठी हिंदुत्व कामी आले, कारण मुळातच कट्टर मराठीपणा आणि कट्टर हिंदुत्व हा सेनेचा स्वाभाविक कल होताच. विलेपार्ले येथील

रमेश प्रभू-प्रभाकर कुंटे या निवडणुकीतील धर्माच्या वापराबद्दलच्या कोर्टबाजी नंतर ती निवडणूक सेनेने हिंदुत्व कार्डावर जिंकली.देशातील हिंदुत्वाच्या राजकारणाची ती सुरवात होती. प्रमोद महाजन यांनी एका जाहीर भाषणात हे बोलून दाखवले होते.

त्यानंतर सेनेचे हिंदुत्वावर जास्त भर देणे सुरु झाले. हिंदुत्व या समान मुद्द्यामुळे आणि नंतरच्या काळातील मुंबईतील जातीय दंगलींमुळे सेना-भाजप जवळ आले आणि दोघांनाही हिंदुत्वाचा फायदा झाला तो अगदी आतापर्यंत काडीमोड घेईपर्यंत!

पूर्वीपासूनच कडवे असलेले शिवसैनिक हे मागील काही वर्षात अधिकच कडवे हिंदुत्ववादी झालेले आहेत. त्यामुळे निधर्मी संस्कृती असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांशी युती अजूनही कट्टर सैनिकांच्या पचनी पडत नाही हे उद्धव ठाकरे आणि राऊत यांना चांगले माहित आहे.

अशा परिस्थितीत मविआ टिकवणे आणि हिंदुत्वही जपणे (कारण ती सेनेची ओळख आहे) ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत अवघड अशी तारेवरची कसरत आहे. त्यांना त्यात मदत करणे ही खरे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही जबाबदारी आहे. प्रादेशिक पक्षच असलेल्या राष्ट्रवादीला चांगले समजते. पण अखिल भारतीय अस्तित्व असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला त्याचे अजूनही आकलन नाही, किंवा त्यांचे स्थानिक नेते ही गोष्ट त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला समजावून देण्यात कमी पडतात.

अशा वेळी जेंव्हा राहुल गांधी सावरकरांच्या बाबत अशी विधाने करतात, तेंव्हा उद्धव ठाकरे यांना त्याविरुद्ध बोलणे हे क्रमप्राप्त आहे. आपले कार्यकर्ते आणि मतपेढी सांभाळायचा तो भाग आहे.

आघाडी टिकवायची असेल तर सहमतीच्या मुद्द्यांवर भर द्यावा लागतो आणि संघर्षाचे मुद्दे back burner वर ठेवावे लागतात. या विषयातील वाद किती मर्यादेपर्यंत ताणायचा हे जर काँग्रेसला समजत नसेल तर मात्र मविआ धोक्यात येऊ शकते.

Tags:    

Similar News