सोलापूर, माढा मतदारसंघातून राम सातपुते अन् निंबाळकरांचे उमेदवारी अर्ज दाखल

Update: 2024-04-16 10:51 GMT

सोलापूर आणि माढा लोकसभेतून आज भव्य रॅली आणि शक्तिप्रदर्शन करत आमदार राम सातपूते आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते.

यावेळी, सोलापूरच्या छत्रपती संभाजी चौकातून भव्य शक्तीप्रदर्शनासह रॅलीची सुरूवात झाली. फुलांनी सजवलेल्या गाडीत माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर(Ranjitsigh Naik Nimabar), सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते(Ram Satpute) यांच्यासह मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील सहभागी होते.

माढ्यातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार गटात गेलेले धैर्यशील मोहिते पाटील यांचं आव्हान असणार आहे त्यामुळे माढ्यातील या लढतीकडे राज्यासह देशाचेही विशेष लक्ष लागलेलं आहे. कारण माढ्याचे नेतृत्व शरद पवार यांनी केलेले आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांची विजयी संकल्प रॅली काढण्यात येत आहे. या विजयी संकल्प रॅलीसाठी फडणवीस हे सोलापुरात दाखल झाले आहेत. या विजयी संकल्प रॅलीत दोन्ही उमेदवारांसह फडणवीस, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, शहाजी पाटील, सचिन कल्याणशेट्टी, जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील, उमेश पाटील हे प्रामुख्याने सहभागी झाले आहेत. 

Tags:    

Similar News