नाना पटोले यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे उत्तर

Update: 2021-07-12 11:40 GMT

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असूनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नाना पटोले यांच्यासारख्या छोट्या माणसाच्या आरोपांवर बोलण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी सांगितले होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने नाना पटोले यांना उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाना पटोले यांना जोरदार उत्तर दिले आहे. नाना पटोले यांनी आपल्यावर आपलेच सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांना माहिती नसल्याने केला आहे. नाना पटोले यांनी त्यांच्याच पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी आणि आरोप करावे, असे मलिक यांनी म्हटले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात कुठलेही सरकार असले तरी अशाप्रकारे गृहखात्याकडून माहिती गोळा केली जात असते. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या दौऱ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. तसेचे हा प्रकार पटोलेंच्या बाबतीतच होतो असे नाही तर सुरक्षा यंत्रणा सतर्क राहावी यासाठी प्रत्येक सरकारमध्ये असे होत असते. नाना पटोलेंनी काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलून माहिती घ्यावी, माहिती न घेता आरोप करु नये, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

Full View

नाना पटोलेंचा आरोप काय?

आपण स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते आपल्यावर लक्ष ठेवून असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन आपले फोन टॅप केले जातात असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळा इथे काँग्रेस कार्यकर्त्याँशी संवाद साधताना त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

Tags:    

Similar News