मणिपूरमध्ये कॉंग्रेसला खिंडार, गोविंददास कोंथऊजम भाजपात

काँग्रेसचे मणिपूरचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले गोविंददास कोंथऊजम यांनी रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अवघ्या ५ दिवसांपुर्वी मणिपूर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी वैयक्तिक कारण सांगुन राजीनामा दिला होता.

Update: 2021-08-01 08:32 GMT

काही महिन्यांपुर्वी पश्चिम बंगाल सोबत ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला. कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर राजस्थानमध्ये सचिन पायलट देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतू ती फक्त अफवाच ठरल्यानंतर आता काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे मणिपूरचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले गोविंददास कोंथऊजम यांनी रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अवघ्या ५ दिवसांपुर्वी मणिपूर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी वैयक्तिक कारण सांगुन राजीनामा दिला होता. भाजपच्या दिल्लीमधील पक्ष कार्यालयात गोविंददास यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलुनी यांनी रविवारी सकाळीच भाजपमध्ये एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार असल्याचं ट्वीट केलं होतं. त्याप्रमाणे दुपारी १२ वाजता गोविंददास यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह, प्रदेशाध्यक्ष सरदा देवी तसेच राष्ट्रीय प्रवक्ते आणि मणिपूरचे प्रभारी संबीत पात्रा हे देखील उपस्थित होते. "पुढील वर्षी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मी या निवडणुकांमध्ये भाजपासाठी पूर्ण क्षमतेनं काम करेन", अशी प्रतिक्रिया गोविंददास यांनी पक्षप्रवेशानंतर दिली.

गोविंददास हे मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बराच काळ काम करत होते. मात्र, वैयक्तिक कारणं पुढे करून त्यांनी ५ दिवसांपूर्वी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. याशिवाय, त्यांनी मणिपूर विधानसभा आमदारकीचा देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्यामागे वैयक्तिक नसून अंतर्गत राजकीय कारणे असावीत, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

 गोविंददास हे पूर्वेकडील राज्यांमधले आणि विशेषत: मणिपूरमधले महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या विष्णुपूर मतदारसंघातून ते ६ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मणिपूर विधानसभेची एकूण सदस्यसंख्या ५६ आहे. यापैकी भाजपाकडे २५ जागा असून काँग्रेसकडे १७ जागा होत्या. मात्र, आता गोविंददास यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं संख्याबळ १६ वर आलं असुन त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Tags:    

Similar News