आदित्य ठाकरे यांना अटक करा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नितेश राणे विरुद्ध आदित्य ठाकरे यांच्यात खडाजंगी सुरुच असते. दरम्यान आता आदित्य ठाकरे यांना अटक करा, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Update: 2023-09-28 04:42 GMT

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा धक्कादायक आरोप राणे पिता पुत्रांनी केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे लवकरच तुरुंगात जातील, असंही म्हटलं जात होतं. मात्र आता दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना अटक करा, अशी मागणी करत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध असून आदित्य ठाकरे यांना सीबीआयने ताब्यात घ्यावे, असं म्हणत सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या रशीद खान यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ३ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमुर्ती अरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

रशीद खान यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटलं आहे की, सीबीआयने या प्रकरणी दोन्ही बाजूंनी सखोल चौकशी केली नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंची चौकशी करून सीबीआयने आपला रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी रशीद खान यांनी यावेळी केली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनीही दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित धक्कादायक खुलासे माझ्याकडे आहेत. तपास यंत्रणांना मी हे पुरावे देणार असल्याचे म्हटले होते. त्याबरोबरच नारायण राणे यांनीही काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

8 जून 2020 रोजी दिशा सालियन ची मालाडमधील तिच्या घराच्या 14 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे समोर आले. मात्र या प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप करण्यात येत असल्याने आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News