नव्या वर्षात कांदा काय म्हणतोय?

what onion says in new year analysis by deepak chavan

Update: 2021-01-29 03:22 GMT

जानेवारीत भारतीय कांद्याची पडतळ स्पर्धक देशांच्या तुलनेत उंच असल्याने निर्यातीला फारसा उठाव मिळणार नव्हता. फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार निर्यातदारांकडूनही याबाबत दुजोरा मिळाला आहे.

चालू महिन्यात भारतीय कांद्याची पोर्ट प्राईस 3300 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान होती. त्यातुलनेत स्पर्धक देशांचा कांदा स्वस्त होता. उदा. पाकिस्तानी कांदा 2000 रुपये प्रतिक्विंटलला उपलब्ध होता. त्यामुळे, संपूर्ण जानेवारी महिन्यात सुमारे 50 हजार टनाच्या आसपास माल निर्यात झाल्याचे रिपोर्ट्स आहेत. सामान्य स्थितीत महिनाकाठी दोन ते अडीच लाख टन निर्यात क्षमता आहे.

गेल्या वर्षी 15 मार्चपर्यंत निर्यातबंदी उठवली नव्हती. यंदा पंजाबमधील शेतकरी आंदोलनाच्या दबावामुळे सरकारला लवकर निर्णय घ्यावा लागला. आणि नववर्षारंभीच निर्यात सुरू केली. निर्यातबंदी लवकर उठवली नसती तर महाराष्ट्रात मोठा असंतोष निर्माण झाला असता.

भारतात बाजार समिती पातळीवर क्वालिटी माल 1800 ते 2000 हजारच्या पातळीवर उपलब्ध असला की चांगली निर्यात पडतळ येते. आखाती देश वगळता अन्य आयातदार देशांतील रिटेल मार्केट हे रेट सेन्सिटिव्ह आहे.

ज्या ज्या वेळी भारतात बाजार समिती पातळीवर कांद्याचे बाजारभाव तीन हजारापेक्षा अधिक राहतात. तेव्हा आयातदारांकडील मागणी घटते. निर्यात अत्यल्प प्रमाणात होते. निर्यात सुरू ठेवली तरी फार मोठ्या प्रमाणात कांदा देशाबाहेर जात नाही. उलट निर्यातबंदी लादल्याने देशांतर्गत बाजारातील सेंटिमेंट खराब होते आणि शेतकऱ्याचे नुकसान होते. पडत्या भावात साठेबाज खरेदी करतात. कृत्रिम टंचाई, साठेबाजीला ऊत येतो. म्हणून, निर्यातबंदी करणे अव्यवहार्य ठरते.

जानेवारीत देशातील प्रमुख बाजार समित्यांत क्वालिटी कांद्याचे रेट्स तीन हजाराच्या आसपास होते. काही प्रमाणात उन्हाळी शिल्लक माल आणि देशभरात ठिकठिकाणाहून नव्या मालाची संतुलित प्रमाणात आवक झाल्याने बाजारभाव बऱ्यापैकी स्थिर होते. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये रोपवाटिका आणि लागणी मोठ्याप्रमाणावर खराब होवूनही जानेवारीत लाल कांद्याच्या पुरवठ्यात मोठी तूट दिसली नाही, हे विशेष. वाढत्या लागणींतून तूट समायोजित झाली असावी असे दिसते. देशांतर्गत 15 ते 18 लाख टन मासिक गरजेच्या तुलनेत बऱ्यापैकी संतुलित पुरवठा जानेवारी महिन्यात झाला आहे.

जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी-मार्चमध्ये कांद्याचा पुरवठा वाढेल. एकूण मागणीच्या तुलनेत पुरवठा संतुलित राहणे गरजेचे आहे. कारण, लाल कांद्याचा स्टॉक करता येत नाही. लेट खरीपाचे क्षेत्र वाढले असले तरी पुरवठावाढ ही सर्वस्वी सध्याची नैसर्गिक स्थिती, पर्यायाने प्रतिएकरी उत्पादकतेवर अवलंबून राहील. - दीपक चव्हाण

#कांदानोंदी2021

Tags:    

Similar News