अमेरिकन "चिया सीड" लागवडीतून हा शेतकरी कमावतोय लाखोंचे उत्पन्न

Update: 2023-03-17 12:26 GMT

मागील तीन महिन्यांपासून कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता कांद्यालाही भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत असल्याचे आहे. या प्रतिकूल परिस्थितीत नांदेड जिल्हयातील मुखेड येथील चांडोळा गावातील शेतकरी शिवाजी तमशेट्टे यांनी पारंपरिक पिकासोबतच अमेरीकन चियासीड या पिकाची लागवड केली आहे हे पिक शेतकऱ्यांना परवडणारे असल्याचे या शेतकऱ्याचे मत आहे. अवघ्या अडीच एकरमध्ये त्यांना ११ क्विंटल उत्पन्न घेतले आहे. याला ७० हजार रूपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. औंषधासाठी याचा वापर होत असल्याने बाजारपेठेत याला मोठी मागणी होत आहे, असे शेतकरी तमशेट्टे यांनी सांगितले.


 



मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील शेतकरी श‍िवाजी गंगाधर तमशेट्टे यांना एकुण आठ एकर शेतजमीन आहे. मागील दोन वर्षापासून ते शेती करतात. गतवर्षी त्यांनी सात एकरमध्ये हरभरा पिकाची लागवड केली होती. यासाठी ६५ हजार रूपये लागवडीसाठी त्यांना खर्च आला होता. यातून ९० हजाराचे उत्पन्न झाले. अपेक्षीत भाव पिकाला मिळाला नसल्याने शेतकरी शिवाजी तमशेट्टे हे कंटाळून गेले होते. काय करता येईल याच्या ते शोधात होते. मोबाईलवर नवी पिक पध्दती पाहत असताना त्यांना अमेरिकन चिया सीडच्या लागवडीची कल्पना सुचली. यातून भारतात कुठे हे पिक घेतले जाते याची त्यांनी माहिती घेतली.

मध्यप्रदेशातून १४०० रूपये किलो प्रमाणे साडे सात किलो बियाणे त्यांनी विकत आणले. सोयाबीन, मुग, उडीद या पिकाप्रमाणेच या पिकाची लागवड केली. याला कोणत्याही प्रकाचा खत लागत नसून सुपीक जमीन असेल तर चार ते पाच वेळा पाणी पाळया द्याव्या लागतात. साधारण जमीन असेल तर, सात ते आठ वेळा पाणी पाळयांची गरज लागते असे शेतकरी शिवाजी तमशेट्टे यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये पिकाची लागवड केली. लागवडीसाठी २० हजार रूपये इतका शेतकरी तमशेत्ते यांना खर्च आला आहे. लागवडीनंतर पिकावर कोणत्याही प्रकारची फवारणी अथवा खत टाकण्याची आवश्यकता नसून औंषधी असल्याने हरण, रानडुकर व अन्य जनावरे खात नाहीत. याशिवाय यावर कोणताही रोग पडत नाही, असे शेतकरी तमशेट्टे म्हणाले.




 


चिया सीडची शेती केली तर क्विंटलला लाखापर्यंत भाव मिळू शकतो. म्हणूनच शेतक-यांनी आत्महत्या आणि दुस-या पिकाच्या मागे न लागता कमी खर्चात जास्त उत्पन्न देणा-या "चिया सिड" पिकाची लागवड करावी. लागवडीसाठी शेतक-यांना ७०० रूपये किलोप्रमाणे बियाणे दिले जात आहे. मागील वर्षी या पिकाला हैद्राबादच्या बाजारपेठेत एक लाखापर्यंत क्विंटलाला भाव मिळाला होता. यंदा ७०० रुपये किलो तर क्विंटल मागे ७० हजार रूपये इतका भाव मिळत असून ऑगस्टपासून ते डिसेंबरपर्यंत आणखी भाववाढ होते, असे शेतकरी शिवाजी तमशेत्ते यांनी सांगितले. औंषधासाठी पिकाचा उपयोग

मधुमेह, रक्तदाब, -हदयरोग तसेच सौंदर्यप्रसादनातही "चिया सिड" उपयोग होतो. त्यामुळे औंषधी कंपन्यांकडून याची अधिक मागणी होते. याश‍िवाय वजन कमी करण्यासाठीही या बियांचा वापर होतो. तसेच अमेरिका, चिनमध्ये मद्यामध्ये या बिया टाकून ते पिले जाते, असे शेतकरी तमशेट्टे यांनी सांगितले. विविध व्याधींवर या बिया परिणामकारक असल्याने याला चांगली मागणी आहे.

Tags:    

Similar News