Farmer Long March : शेतकऱ्यांचा निर्धार पक्का, निर्णय हाती येऊस्तोवर माघार नाहीच

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर आमच्या हाती शासनादेश येऊस्तोवर आम्ही माघार घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

Update: 2023-03-17 02:24 GMT

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी किसान सभेच्या (Kisan Sabha) नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी ते मुंबई (Nashik To Mumbai) अशा लाँग मार्चचे आयोजन केले होते. हा लाँग मार्च मुंबईच्या (Mumbai) वेशीवर येऊन धडकला आहे. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांना बैठकीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. मात्र आमच्या हाती शासनादेश येऊस्तोवर आम्ही माघार घेणार नसल्याचे किसान सभेच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी बोलताना किसान सभेचे अशोक ढवळे (Ashok Dhawale) म्हणाले की, पाच दिवसांपासून शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्यामध्ये नगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबरच महिला आणि आदिवासी लोक होते. हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने येत असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भेटीसाठी निमंत्रण दिले होते. त्यानुसार आम्ही बैठकीला आलो होतो. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्री आणि 15 शेतकऱ्यांचे नेते उपस्थित होते.

यावेळी या बैठकीत सरकारने कांद्याला अनुदान देण्यासंदर्भात, दुध उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी मिल्कोमीटर, वनाधिकाराची अंमलबजावणीसाठी समिती, कर्जमाफीची कक्षा वाढवण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना बारा तास दिवसा विज देण्यासंदर्भात सरकारने सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर आम्ही सरकारला स्पष्टपणे सांगितले की, या मागण्या मान्य झाल्या त्याची प्रत आम्हाला देण्यात यावी. तसेच या मागण्यांचं निवेदन सरकारने विधानसभा आणि विधानपरिषदेत करावे. तसेच हे पत्र जिल्हाधिकारी, तहसिलदार आणि शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात यावे. त्यानंतर याची अंमलबजावणी सुरु झाली नाही तर आम्ही पुन्हा स्थगित केलेला मोर्चा मुंबईच्या दिशेने घेऊन येऊ, असं मत अशोक ढवळे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना अशोक ढवळे म्हणाले, आम्ही लाँग मार्च मागे घेतला नाही. तर त्याचे रुप बदलून महामुक्काम असा केला आहे. त्यामुळे सरकारने 20 तारखेपर्यंत यासंदर्भात निर्णय दिला नाही तर आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने येऊ. कारण 2018 मध्ये दिलेल्या आश्वासनांमधून आम्ही काही गोष्टी शिकलो असल्याचे डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी सांगितले. 

Tags:    

Similar News