मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला धक्का, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली....

Update: 2020-11-16 03:30 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विटद्वारे आक्षेपार्ह शब्दात टीका करणाऱ्या समीत ठक्कर यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. समीत ठक्कर यांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. या अटकेला आव्हान देत समीत ठक्कर यांनी सुप्रीम कोर्टात कलम ३२ अंतर्गत याचिका दाखल केली होती. तसंच त्यांच्याविरुद्धच्या सर्व FIR एकत्रित करण्याची मागणी त्यांनी केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ठक्कर यांची याचिका फेटाळत त्य़ांना हायकोर्टात जाण्यास सांगितले. "हायकोर्टसुद्धा तुमच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करु शकते" असे हायकोर्टाने म्हटलेले आहे.

ठक्कर यांच्यावतीने एडव्होकेट महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. पण मुख्य न्यायमूर्ती एस.ए.बोबडे यांनी जेठमलानी यांना याचिका मागे घेऊन योग्य व्यासपीठ अर्थात हायकोर्टात जाण्यास सांगितले. यावेळी युक्तीवाद करताना जेठमलानी यांनी सांगितले की FIR मध्ये उल्लेख केलेले सर्व गुन्हे जामीनपात्र आहेत. पण तरीही ठक्कर यांना अटक करण्यात आली. यावेळी जेठमलानी यांनी प्रतिज्ञापत्राचा उल्लेख करत कोर्टाने ते वाचले तर त्यांना धक्का बसेल, असे म्हटले. यावेळी मुख्य न्यायमूर्तींनी उत्तर देत "आम्ही दररोज अशा खूप केस पाहतो, त्यामुळे आम्हाला धक्क्यांची सवय झाली आहे, त्यामुळे आम्हाला धक्का बसणार नाही" असा टोला लगावला. त्याचबरोबर कलम ३२ अंतर्गत दाखल याचिकेवर आम्ही सुनावणी घेणार नाही हे वारंवार सांगूनही तुम्ही ऐकत नाहीत याचे आम्हाला आश्चर्य वाटते, अशी नाराजीही कोर्टाने व्यक्त केली. दरम्यान सरकारी वकिलांनी आपल्या युक्तीवादामध्ये तपास संपला असल्याने समीत ठक्कर यांच्या जामिनाला आम्ही विरोध केला नसता असे सांगितले.

१ जुलै २०२० रोजी समीत ठक्कर यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप करत नागपूरमध्ये शिवसेनेच्या नितीन तिवारी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबईतही शिवसेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांनी तक्रार दाखल केली होती. या सर्व तक्रारींनंतर समीत ठक्कर यांनी हायकोर्टात आव्हान देत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण समीत यांना राजकोटमधून नागपूर पोलिसांनी अटक केली होती.

Tags:    

Similar News