'ग्रँड ओल्ड' असलेली काँग्रेस 'यंग इंडिया' साठी खरंच तयार आहे का?

Update: 2017-12-16 09:50 GMT

"धमाकेदार भाषणाने राहुल गांधी यांच्या नव्या प्रवासाची नांदी. अफलातूनपणे हिंदी आणि इंग्रजी भाषेचा मिलाफ. जियो राहुल गांधी." अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकल्यावर एका मित्राने "अचाट आणि अफाट काहीच नाही त्यांनी ते वाचून दाखवलं आहे, स्पीच रायटरच कौतुक करा साहेब! वाचणाऱ्याच नाही" अश्या शब्दांत तात्काळ उत्तर दिले. त्यावर त्या मित्राला "मग मोदींचा उदोउदो न करता पॉलिसी बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना श्रेय देत जा की तुम्ही" असे म्हणत कोपरखळीदेखील दिली.

हे संभाषण मनोरंजन म्हणून ठीक वाटतं असलं तरी यावरून लक्षात येईल की ज्याला पप्पू-पप्पू म्हणून हेटाळले, ज्याला तुम्ही जितक जास्त बोलाल तितका आमचा फायदा होईल असे म्हंटले त्याचं राहुल गांधींच्या मागील आठवड्यातील एका मुलाखातीने विरोधकांना निवडणूक आयोगाकडे धाव घ्यायला भाग पाडले. यावरून देश माहिती नाही कितीपत बदलतोय पण राहुल गांधी निश्चितच बदलत आहेत.

साडे तीन वर्षात काहीही सिद्ध न करणारी गांधींची काँग्रेस उत्सवात मग्न, तर सर्वत्र सिद्ध करणारी मोदींची भाजप #मिशन२०१९ मध्ये व्यस्त आहे. मात्र काँग्रेसला बळ मिळावे यासाठी गेले अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्मितीसाठी कदाचित १८ डिसेंबरनंतर किती दिवस वाट पहावी लागली असती ते माहिती नाही. म्हणून कदाचित त्यापूर्वीच राहुल यांचा राज्याभिषेक आटोपून घेतला गेला असावा.

सोनिया गांधींनी त्यांच्या भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे स्थापनेपासून आजवरच्या काळात काँग्रेस सध्या सर्वात कठीण परिस्थितीत आहे. पक्षात कार्यक्षम नेते आणि सक्रिय कार्यकर्ते यांची वानवा आहे. भाजपला पूरक मदत करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खोलवर रुजला आहे त्याच्या एकदम विरुद्ध काँग्रेसचे सेवादल केवळ झेंडावंदन आणि भाषणात नाव घेण्यापुरते अस्तित्वात आहेत. आज सोनिया बाईंनी केलेले भाषण अपेक्षेप्रमाणे भावूक होते तर राहुल आक्रमक मूडमध्ये होते. राहुल यांनी त्यांच्या भाषणात काळानुरूप काँग्रेस बदलण्यास सज्ज असल्याचे म्हंटले आहे. पण, हे बोलणे सोप्पे आहे पण प्रत्यक्ष अमंलबजावणी तितकीच कठीण आहे.

ग्रँड ओल्ड काँग्रेसला जगातल्या सगळ्यात मोठ्या मिस्ड कोल्ड पार्टीकडून आव्हान आहे. ज्या भाजपने राहुल यांचे वडील स्व. राजीव गांधींच्या वैज्ञानीक संकल्पनांना हवेतले इमले असे हेटाळले पण काळाची पाऊले ओळखत आज डिजीटल इंडिया, कॅशलेस इकॉनॉमी असे बदल केले. त्याप्रमाणे आता काँग्रेसने नव्या रुपात, नव्या ढंगात आपल्या धोरणांत हळूहळू बदल करणे अपरिहार्य आहे.

संघटनेत तेच तेच जुने चेहरे दिसले की काय होत ह्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देशातील काँग्रेसची सद्यस्थिती. यावर्षी १७ मे २०१७ रोजी यात बदल होताना दिसला अखिल भारतीय काँग्रेसने जुने सर्वजण बाजूला ठेऊन ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, आरपिएन सिंग, रणदीप सुरजेवाला, सुश्मिता देव अशा नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी दिली. ज्यापद्धतीने युवा टिमने मोदी सरकारवर ताशेरे ओढले ते कौतुकास्पद होते.

काँग्रेसमधील सक्रीय लोकांवर जबाबदाऱ्या देऊन त्यांची मजबूत फळी तयार करणे अनिवार्य आहे. राजकारणात जय पराजय हा कोण्या एका व्यक्तीचा होत नसतो. विजयासाठी आवश्यक असते ते सूत्रबद्ध नियोजन, लोकांपर्यंत नेत्यांचे विचार पोहोचवणाऱ्या आणि पटवून देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी. या सर्व प्रक्रियेत जेष्ठांचे मार्गदर्शन आवश्यकच आहेच पण त्यांनी योग्य वेळी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाणे याला खूप महत्व आहे. कारण निर्णय प्रक्रियेत तरुण रक्त धडाडीने निर्णय घेऊ शकते. जेष्ठांनी सल्लागार म्हणून काम करणे अपेक्षित असते, मात्र जेव्हा जेष्ठचं निर्णय घेतात तेव्हा ‘जनरेशन ग्याप’ पडतोच. शेवटी जर भाकरी फिरवली नाही तर ती ही करपते. सोनिया गांधींचा आदर्श घेत जेष्ठ काँग्रेस नेत्यांनी लवकरात लवकर तरुणांसाठी जागा करून देणे सर्वांच्या हितावह असेल.

आज राहुल यांचे भाषण संपते न संपते तोच राहुल त्यांच्या भाषणात विजय दिवसाचा उल्लेख करायचा विसरले, त्यांनी दुसऱ्याचे लिहलेलं वाचलं अश्या कुत्सित टिप्पणी यायला लागल्या त्यातच सार आलं की ज्यांनी पप्पू म्हणून हेटाळले त्यांचेच पप्पा होण्यासाठी यंग राहुल गांधी सज्ज आहेत.

जाता जाता...

राहुल गांधी ह्यांना मजल दरमजल करत एक एक राज्य जिंकत देश जिंकवा लागणार आहे. यात महाराष्ट्र मोठी भूमिका बजावू शकतो. यासाठी त्यांच्या टीममध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि राजीव सातव यांच्यावर अधिकाधिक जबाबदारी द्यायला हवी. किंबहुना त्याची नांदी झाली आहे म्हणा. गुजरात निवडणूक काळात वाहिन्यांवर अनेकदा पृथ्वीराज चव्हाण प्राईम टाईममध्ये काँग्रेसची बाजू मांडताना दिसले. दुसरीकडे राजीव सातव हे गुजरातमध्ये ठाण मांडून होते. हे सातत्याने व्हायला हवे. पृथ्वीबाबांना प्रशासन आणि राजकीय मुद्द्यांची चांगली जाणीव आहे तर सातव ये सयंत आक्रमी नेते आहेत, भाषेवर चांगली पकड आणि अभ्यासू वृत्ती ही त्यांची जमेची बाजू आहे. खरतर कठीण काळात अशोक चव्हाण यांनी एकहाती नांदेड जिंकले असले तरी त्यांना काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांची नावे तरी माहिती असतील का याची शंका वाटते. अशोक चव्हाण म्हणजे केवळ आपल्या वतनात रमणारे सरदार झाले आहेत तेव्हा त्यांना आता ब्रेकची गरज आहे. असे धाडसी निर्णय गल्ली ते दिल्ली आवश्यक आहेत. थोड्या प्रसृतीवेदना होतील पण त्यातून होणार अपत्य काँग्रेस आणि पर्यायाने देशासाठी हितकारक असेल.

Similar News