New Yorkमध्ये इतिहास घडला! महापौर झाले जोहरान ममदानी
अमेरिकेतील निवडणुकांच्या निकालांवर लेखक संजीव चांदोरकर यांची काही निरीक्षणे.
न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीची चर्चा गेले काही महिने गाजत राहिली. अपेक्षेप्रमाणे जोहरान ममदानी (Zohran Mamdani) न्यूयॉर्कच्या (New York) महापौरपदी निवडून येत आहेत. हे खूप आश्वासक आहे. त्यांचे अभिनंदन!
पण या निवडणुकीच्या जोडीला न्यू जर्सी, वर्जिनिया येथे देखील गव्हर्नर पदाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या महिला उमेदवार पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. कॅलिफोर्निया राज्यात मतदार संघाच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावावर मतदान होत आहे त्याचे निकाल येतील.
या निवडणुकांकडे गेल्या दहा महिन्यातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या राज्यकारभारावरील मध्यावधी मतदान म्हणून बघितले जात आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प चक्क नापास झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प दुय्यम आहेत. ट्रम्प यांना सर्वाधिकार देणाऱ्या MAGA राजकीय तत्त्वज्ञानाला देखील अमेरिकन मतदार नागरिकांनी स्पष्ट नकार दिला आहे. देश एकवंशीय असणार की बहुवंशीय या प्रश्नाचे निःसंदिग्ध उत्तर बहुवंशीय असेल! ट्रम्प यांच्या disapproval पेक्षा हे दुसरे अधिक महत्त्वाचे आहे.
काही निरीक्षणे..
सर्व ठिकाणचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार निर्णायक मताधिक्याने निवडून आले आहेत. कुठेही संदिग्धता नाही. संसदीय निवडणुकांचा वापर करत हुकुमशहा सत्तेवर येतात हे वारंवार सांगितले जाते. पण त्याच संसदीय निवडणुकांमध्ये हुकूमशाहना खाली खेचण्याची देखील ताकद आहे हे परत परत स्वतःलाच सांगावयास हवे.
ममदानी यांनी बोजड वैचारिक मांडणी न करता ठोस राजकीय आर्थिक कार्यक्रम मतदारांसमोर ठेवला. ठोस, फाफटपसारा न करणारी स्पष्ट मांडणी मतदार नागरिकांच्या मनाचा ठाव घेऊ शकते. आरोग्यसेवा, नागरी वाहतूक, घरांच्या किमती आणि भाडे, शिक्षण, रोजगार, वेतनमान… आधुनिक औद्योगिक मानवी समाजाच्या त्याच त्या शेकडो वर्षे जुन्या पायाभूत गरजा आहेत. बाकी सारे नंतर येते.
ममदानी यांनी Affordability/ परवडणाऱ्या किंमती हा शब्द अजेंड्यावर आणला आहे. सर्व वस्तुमाल / सेवांच्या किंमती बाजार ठरवेल, market determined असतील. या नव उदारमतवादी तत्त्वाला Affordability चे तत्व छेद देते. हा खूप मोठा मेसेज आहे.
प्रस्थापित व्यवस्था प्रस्थापित राज्यकर्त्यांविरुद्ध खूप असंतोष आहे म्हणून सत्ता बदल होणार नाही. त्यासाठी संघटना पक्ष यांचे प्लॅटफॉर्म लागतात. तो असंतोष channelise करण्यासाठी कार्यक्रम आणि पक्ष, संघटनाचे विश्वासार्ह प्लॅटफॉर्म लागतात.
जीवन मरणाच्या राजकीय संघर्षात दरवेळी नवीन राजकीय प्लॅटफॉर्म तयार करायची गरज नसते. अस्तित्वात असलेले राजकीय प्लॅटफॉर्म वापरावे लागतात. एक तातडी असते. इतिहासात डोकावले तर हे दिसेल की डेमोक्रॅटिक पक्षाच्या अमेरिकन प्रस्थापित वर्ग धार्जिण्या भूमिका काही कमी निंदनीय नाहीत. (अब्जाधीश अँड्र्यू क्यूमो यांनी आपली हयात डेमोक्रॅटिक पक्षात घालवली आहे). पण मतदार नागरिक राजकीय दृष्ट्या खूप प्रगल्भ असतात.
शेवटी तरुण पिढीबद्दल..
“जनरेशन झेड” (Gen Z) ची चर्चा आशियाई राष्ट्रामध्ये बरीच झाली. पण नवउदारमतवाद पुरस्कृत जागतिकीकरणानंतर जन्माला आलेली ही पिढी प्रत्येक देशात आहे. ती tech savvy आहे. तिला स्वप्ने, आकांक्षा आहेत. तिला राजकीय परिभाषा कमी अवगत असेल कदाचित पण तिला सामाजिक, राजकीय, आर्थिक भान तसूभरही कमी नाही. आमची पिढी निसर्ग नियमानुसार काळाच्या पडद्याआड जाणार. पण हे शतक या पिढीचे आहे. ती तिच्या पद्धतीने एक एक प्रश्न हाताळणार याबद्दलचा विश्वास बळकट झाला.
हे सारे अमेरिकेबद्दल आहे हे खरे. पण अजूनही अमेरिका जगासाठी ट्रेंड सेंटर आहे. अगदी आपल्या भारतासाठी देखील.
खूप दिवसांनी छान वाटत आहे.
संजीव चांदोरकर