मोदींचं काम विरोधक का करत आहेत? : हेरंब कुलकर्णी

मोदींनी कोणता पंचा घातला, मोदींनी दाढी वाढवली, मोदी बांगलादेशच्या लढाईत सहभागी झाले का? यासारख्या विषयांवर भाष्य करून विरोधक मोदी दिग्दर्शनातच आपला जास्त वेळ खर्च करत आहे का? आपण मोदींनी सेट केलेल्या अजेंड्यावर प्रतिक्रिया देणारे प्रतिक्रियावादी झालो आहोत का? आपल्या विचारांची रेघ मोठी करण्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार? वाचा हेरंब कुलकर्णी यांचा लेख

Update: 2021-03-30 01:56 GMT

बांगलादेशमध्ये मोदींनी जे विधान केले त्याच्यावर सोशल मीडियात अक्षरशः प्रतिभेला बहर आला आहे. शेकडो विनोद आणि पोस्ट सारख्या पडत आहेत आणि त्यातील उपहासही अतिशय उंचीचा आहे. या निमित्ताने एक मुद्दा लक्षात येतो. आपल्या सगळे चाहते आणि विरोधकांना आपल्या भोवती फिरवत ठेवण्यात ते यशस्वी ठरत आहेत.

मागील वर्षी 'टाळ्या वाजवा,नंतर दिवे लावा' भोवती ही विरोधक असेच गोल गोल फिरले आणि सातत्याने त्यांच्या प्रत्येक कृतीला खूप महत्त्व देऊन त्यांना प्रकाशझोतात ठेवण्याचे काम मोदी विरोधकच जास्त करत आहेत का ? असे वाटू लागते. त्यांनी वाढवलेली दाढी, रवींद्रनाथ टागोर यांची वेशभूषा, लस घेताना खांद्यावर आसामचा पंचा, या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी वर सोशल मीडिया फिरतो आहे आणि त्यात भक्तांपेक्षा विरोधक जास्त पुढे आहेत...

मुख्य मुद्दा हा आहे की, त्यांना पर्याय देण्यापेक्षा आपण त्यांच्या दोष दिग्दर्शनातच जास्त वेळ घालवतो आहे. असे वाटत नाही का ? ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्याला पर्याय म्हणून आपण जी विचारधारा म्हणतो त्या विचारधारेची रेघ मोठी व्हावी अशा पोस्ट, अशा प्रकारचे आपले काम सतत पुढे यायला नको का ? आपण फक्त प्रतिक्रियावादी झालो आहोत का ? त्यांनी अजेंडा सेट करायचा व आपण त्या अजेंड्यावर टीकेची झोड उठवून त्या अजेंड्यावर चर्चा घडेल. या सापळ्यात अडकायचे ? असेच सुरू आहे. त्यातही त्यांच्या झालेल्या गंभीर चुका त्याचे सामाजिक राजकीय परिणाम होतील अशावर नक्कीच तुटून पडले पाहिजे. परंतु दाढी, पंचा केलेली विधाने, टाळ्या वाजवा, दिवे लावा या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले तर असा काय फरक पडणार आहे ? आपण का फिरत राहतो आहोत ? याचा विचार करायला हवा.

असे म्हटल्यावर काहीजण तुम्हाला त्यांच्यावरची टीका दुसरीकडे वळवायची आहे असाही अर्थ काढतील. परंतु आपण पर्यायावर कमी बोलतो आहोत व non issue वर टीका करून त्यांचे चिंतन जास्त करतो आहोत हे वास्तव तरी मान्य आहे की नाही ? राजकारण समाजकारणात तुम्ही समोरच्याची उपेक्षाही करायची असते. अन्यथा तुम्ही नकळत त्याचेच प्रचारक होता... गोळवळकर गुरुजी यांना एकदा विचारले होते की, तुमचे सर्वात मोठे प्रचारक कोण ? तेव्हा ते म्हणाले की पंडित नेहरू व काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते… कारण ते हजारो-लाखोंच्या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करतात व नंतर आम्ही त्या गावांमध्ये गेल्यावर आमचे काम सोपे होते. कारण लोकांना तो शब्द परिचित झालेला असतो...

तेव्हा आपण यापासून बोध घेऊन आपल्याला जो विचार मांडण्यासाठी काम करायला हवे. त्या विचारसरणीच्या आधारे जनतेचे प्रश्न मोठ्या आवाजात मांडायला हवेत. ते प्रश्न जर आपण मोठे करू शकलो. तरच हा विचार लहान होऊ शकेल. अन्यथा ते रोज काहीतरी करणार आहेत आणि आपण रोज पोस्ट टाकणार आहोत... पण या लाईक आणि कमेंट ने सत्ता बदलत नसते. हे लक्षात घ्यायला हवे, सत्ता फक्त मतपेटीतून बदलते.

Tags:    

Similar News