मराठी शाळा बंद का होत आहेत? : प्रा. हरी नरके

दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. पण एवढे करुन मराठी भाषा वाचणार आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण राज्यात अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद होत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर मराठी शाळा बंद का होत आहेत, याचा विश्लेषण केले आहे प्रा. हरी नरके यांनी...

Update: 2022-01-15 11:59 GMT

मराठी शाळांना कुलूप लावावे लागत असून गरीब- श्रीमन्त सगळे पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे धावू लागलेत. एकट्या मुंबईत मराठी शाळांमधली विद्यार्थी संख्या गेल्या दहा वर्षात एक तृतीयांश झालेली आहे. १ लाख २ हजार वरून ती आता ३५ हजार झालेली आहे.

असे का होतेय, याकडे भावनिक न होता रोकडा व्यवहार म्हणून बघायला हवे.

१) ज्या दिवशी मध्यम, नवमध्यम आणि नवश्रीमंत वर्गाने मराठीचा हात सोडला त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.

२) संस्कृतीकरणाच्या सिद्धांतानुसार सगळे खालचे जात-वर्ग वरच्यांचे अनुकरण करतात. मालकांची मुलं जर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणार असतील तर कामगार, मोलकरणी, हमाल, रिक्षावाले, मजूर, गरीब त्यांचेच अनुकरण करणार.

३) मराठी शाळा का ओस पडताहेत? कारण इंग्रजीला प्रतिष्ठा आहे. आपला पाल्य इंग्रजीतून शिकला की त्याला चांगली नोकरी मिळेल अशी आशा (गाजर) यात महत्वाचे आहे. मराठीची रोजगार क्षमता का रोडावली?ती कशी वाढवायची?मराठी शाळांचा दर्जा घसरला म्हणून पालक तिकडे जात नाहीत? की ते जात नाहीत म्हणून दर्जा वाढवण्याची लढाई ही हारणारी लढाई असल्याने लढण्या आधीच ती राज्यकर्ते, शिक्षणतज्ञ व पालकांनी सोडून दिलीय?

४) इंग्रजी शाळांचा दर्जा बघून पालक मुलांना तिकडे घालतात का? किती इंग्रजी शाळा निव्वळ कामचलावू असूनही तिथली गर्दी हटत नाही असे का?

५) सगळे खापर राज्यकर्त्यां मंडळींवर फोडले की मध्यमवर्गीय दोषमुक्त होतात. सगळे सरकारने करावे. आम्ही आमच्या मुलांना मराठी माध्यमात न घालताच मराठीच्या नावाने गळे काढणार. मराठी शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी काहीही करायचे नाही आणि मराठी शाळा चांगल्या नाहीत अशी बोम्ब ठोकायची ही क्लुप्ती मध्यमवर्गीयांना चांगली जमलीय.

६) जी भाषा रोजगार देत नाही ती मरते. जिला प्रतिष्ठा, मानसन्मान नसतो तिकडे पालक जात नाहीत. तेव्हा खरा प्रश्न आहे तो मराठीची रोजगारक्षमता नी प्रतिष्ठा वाढवण्याचा. मराठीचे २५ वर्षाचे धोरण मराठीची रोजगार क्षमता शेकडो पटींनी वाढवू शकेल. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी शिकवणे, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीचे करणे,मराठीला अभिजात दर्जा देणे, मराठी शाळांचा निधी व दर्जा वाढवण्यासाठी झटणे, मराठीतून शिकलेल्या लोकांच्या यशकथा सतत प्रसिद्ध करून मराठी पालकांचा आत्मविश्वास वाढवणे, असे लांबपल्ल्याचे खूप उपाय करावे लागतील.

मी मराठी माध्यमाच्या मनपा शाळेत शिकलो, माझ्या मुलीला मराठी माध्यमातून शिकवले, अभिजात दर्जा, पहिलीपासून इंग्रजी, २५ वर्षाचे धोरण, मराठी शाळांची दर्जावाढ यासाठी झटतोय, तेव्हा यात कुठेही नसलेल्यांनी मला मार्गदर्शन करून उपकृत करावे ही विनंती.: - प्रा. हरी नरके

Similar News