बिहार मे का बा… महिला कार्ड की निवडणुक आयोग ? NDA साठी VOTE संजीवनी कोण ठरणार ?
7.43 करोड़ लोकसंख्या असलेल्या बिहारमध्ये 6 नोव्हेंबर 2025 पासून विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यातील पहिला टप्पा 6 नोव्हेंबर तर दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला असून 14 नोव्हेंबरला निकाल लागणारेय..
या निवडणुकीच्या मैदानात JDU, BSP, BJP, RJD, INC, AIMIM, LJP(R), HA आणि JSP हे राजकीय पक्ष आपलं भवितव्यं आजमावणार आहेत.
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे 121 विधानसभा जागांसाठी 102 सामान्य आणि 19 अनुसूचित जातींसाठी सुरक्षित असलेल्या जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये 1314 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यात 1192 पुरुष उमेदवार आणि 122 महिला उमेदवार आहेत. तसेच 3 कोटी 75 लाख 13 हजार 302 मतदार आपला मताधिकार बजावणार आहे. यामध्ये 1 कोटी 98 लाख 55 हज़ार 325 पुरुषांची संख्या, 1 कोटी 76 लाख 77 हजार 219 महिलांची संख्या असून 758 तृतीयपंथी आहेत.
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब
देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी हायड्रोजन बॉम्ब म्हणून पत्रकार परिषद घेतली. यात मतचोरी संदर्भात नवीन व्हिडिओ, कागदपत्रं दाखवत निवडणुक आयोग आणि भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. हरियाणामध्ये 25 लाख मतं चोरीला गेल्याचं सांगत निवडणुक आयोगावर आरोप केले आहेत. मतं कशी चोरीला जातात, मतदार यादीतून नावं कशी वगळली जातात... एकच व्यक्ती 22 वेळा मतदान कसे करते, याचे प्रात्याक्षिक राहुल गांधी यांनी दाखवले आहे. सध्या देशातील १२ राज्यात SIR प्रक्रिया सुरु आहे. त्यात राहुल गांधी यांनी बोगस मतदारांचा भांडाफोड करत हरियाणात जे झालं ते बिहारमध्येही होऊ शकते, अशी शक्यता वर्तवलीय.
महिला कार्ड
जेव्हा जेव्हा सत्ता संकटात आलेली आहे, तेव्हा तेव्हा राजकर्त्यांनी महिलांना पुढं करत सत्तेची मलाई खाल्ली आहे. याची अनेक उदाहरणं आहेत... महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार असो किंवा बिहारमध्येच लालू प्रसाद यादव यांनी सत्तेसाठी आपल्या पत्नी राबडी देवी यादव यांना राजकारण काहीही कळत नसताना मुख्यमंत्री पदावर बसवलं होतं. असो…
बिहारच्या विधानसभा निवडणूक 2025 पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी संपली जरी असली तरी पक्षांच्या प्रचार सभांची गर्दी पाहता बिहारच्या भवितव्याचे चित्र असल्याचं स्पष्ट दिसतेय. नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) प्रचार सभेत जेमतेम पुरुषांची संख्या असून सर्वाधिक महिलांची संख्या पाहायला मिळाली. ऐन निवडणुकांच्या तोंडावर एनडीए सरकारने महिला कार्ड पुढे करत महिला रोजगार योजना आणली. योजनेनुसार प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात १० हजार रुपये ही जमा झाले. निवडणुकांनतर महिलांना उद्योगासाठी आणखी २ दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन एनडीए सरकारने दिल्यामुळे तेथील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय.
केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरणाच्या योजनांचा पाढा जनतेसमोर वाचण्यासाठी भाजपच्या नेत्या आणि सध्या टेलिव्हिझनवर आपल्या अभिनयाने अनेकांना भावनिक साद घालणाऱ्या स्मृति इरानी यांनाही बिहारच्या मैदानात भाजपाने उतरवलं आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षाकडून मुख्यमंत्री चेहरा असलेल्या तेजस्वी यादव यांचा प्रचारसभेत महिलांची तुरळक संख्या असून पुरुषांची संख्या सर्वाधिक असल्याचं चित्र पाहायला मिळालं. एनडीएच्या महिला सशक्तीकरणाच्या योजनांच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यांनीही महिला मतदार निवडणुकीत निर्णयात्मक भूमिका पार पाडते हे ओळखून आपल्या जाहीरनाम्यात ते जीविका बहिणींना महिना ३० हज़ार वेतन देत पक्की नोकरी देण्याचे आश्वासन देतात. तर निवडणुकांनंतर प्रत्येक महिलेच्या खात्यावर 2500 रुपये महिन्याला जमा होतील असेही जाहीरपणे सांगतात.
नितीश कुमार विरूद्ध तेजस्वी यादव
एकंदरीतच, मागील विधानसभा निवडणुकीचे आकडे पाहता महिला मतदानाची संख्या सर्वाधिक असल्यामुळे राजकीय नेत्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा हेतू समोर ठेवत निवडणुका जिंकण्याचा मानस केलाय. चाचा विरुद्ध भतीजा असा रंग या निवडणुकीच्या लढतीचा पाहायला मिळतोय. वाढती गुन्हेगारी, आरोग्य, शिक्षा इत्यादी मूलभूत सुविधांवर न बोलता महिला कार्ड खेळत महाराष्ट्र पॅटर्न राबविताना येथील राजकीय पक्ष दिसत आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे बिहार विधानसभा निवडणुकांच्या दौऱ्यावर आहेत, ते सांगतात की, येथे प्रादेशिक पक्षांचा बोलबाला असल्यामुळे पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी असं चित्र दिसत नाही. प्रचारसभा जरी हे मोठे नेते घेत होते तरी त्यांचा इतका प्रभाव नाही. धार्मिक राजकारणाचा फारसा परिणाम नाही. येथील स्थानिक लोकं नीतीश कुमार यांच्याबद्दलही चांगलचं बोलतात आणि तेजस्वी यादव यांच्याविषयीही चांगलचं बोलताहेत. भाजपाचे या ठिकाणी वर्चस्व नसल्यामुळे नीतीश कुमार यांना हाताशी घेऊन भाजप आपला अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करत आहे. महत्त्वाचं म्हणजे एनडीएचा विजय 14 नोव्हेंबरला झाला तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा नीतीश कुमारच असतील याची शक्यता फार कमी आहे कारण नीतीश कुमार यांची तब्येत अलीकडे ठीक नसते. नितीश कुमार यांचे या संदर्भातले व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरलही झाले होते.
दुसरीकडे बिहारस्थित विद्यासागर सांगतात की, इकडे जातीय समीकरणाने राजकारण चालतं. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. जरी त्यांना अधिक जागा मिळाल्या नाही तरी ते एनडीए आणि महागठबंधन या दोघांचे व्होट कमी करतील.
प्रशांत किशोर किंगमेकर ठरणार का ?
निवडणुक एक्सपर्ट म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर एकेकाळी भाजपाला सत्ता मिळावी यासाठी कार्यरत होते. परंतु सध्या त्यांनी जन सुराज पक्ष सुरु करत बिहारमध्ये परिवर्तन करण्याचे ठरवले आहे. 243 जागांपैकी 238 जागांवर त्यांनी आपले उमेदवार दिले आहेत. नुकतेच आलेल्या ओपिनियन पोलनुसार या निवडणुकात प्रशांत किशोर फक्त ३ जागांवर आपले खाते खोलू शकतात. एकीकडे असंही बोललं जात जर अधिक जागा मिळाल्या तर ते किंगमेकर ठरू शकतात.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाची काय परिस्थिती ?
एकेकाळी सर्वात मोठं नालंदा विद्यापीठ असलेल्या बिहारची शैक्षणिक अवस्था जशी हवी तशी नाही. एका बातमी नुसार, बिहार सरकार सर्वाधिक खर्च शिक्षणावर करते परंतु तेथील शिक्षण व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा नाही.
सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत घट पाहायला मिळतेय. आठवीनंतर 39 टक्के विद्यार्थी शाळा सोडतात. तर नववी-दहावीनंतर मुलांचं ड्रॉप आऊटचा दर 60.8 टक्के आहे तर मुलींचा 66.7 टक्के आहे. उच्च शिक्षणासाठी अन्य राज्य येथील विद्यार्थ्यांना पलायन करावं लागतं कारण इंजिनिअरींग आणि मेडिकल कॉलेज सुरु जरी झाले तरी त्यात आवश्यक इंफ्रास्ट्रक्चर नाही.
आरोग्याची काय परिस्थिती ?
ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यानं शहरात यावं लागतं त्यात आईजीआईएमएस मध्ये व्यवस्था चांगली आहे परंतु रुग्णांची खूपच गर्दी पाहायला मिळते. परिणामी रुग्णांना एखाद्या रिपोर्ट साठी २ महिन्यांची वाट पाहावी लागते. नियमांनुसार सरकारी रुग्णालयात 1000 लोकांसाठी एक डॉक्टर अनिर्वाय आहे परंतु या ठिकाणी 22000 लोकांसाठी एक डॉक्टर असून सरकारी रुग्णालयात 30000 लोकांवर एक डॉक्टर उपलब्ध आहे अशी परिस्थिती आहे. तर डॉक्टरभर्ती न केल्यामुळे राज्यात 45 टक्के पद रिक्त असल्याचं समजतेय.
एकंदरित यंदाची निवडणुक भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण राज्यातल्या निकालावर केंद्र सरकारमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रियंका शैला