सडलेला मेंदू शिक्षणाने दुरुस्त होतो का? : विजय चोरमारे

सोशल मीडियावर विकृतांचा नंगानाच सुरू असताना राज्याचा सायबर क्राईम विभाग निष्क्रिय का? एक निवृत्त आयपीएस अधिकारी स्वामी अग्निवेश यांच्या निधनानंतर आनंद साजरा का करतो? एक निवृत्त नौदल अधिकारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं विकृत व्यंगचित्रं फॉरवर्ड करत असताना राज्यातील यंत्रणा कुठं असतात? वाचा रोखठोक अति उच्चशिक्षित लोकांचा सडलेला मेंदू शिक्षणाने दुरुस्त होतो का? ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा लेख

Update: 2020-09-14 07:21 GMT

एक निवृत्त आयपीएस अधिकारी स्वामी अग्निवेश यांच्या निधनानंतर आनंद साजरा करतो. एक निवृत्त नौदल अधिकारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं विकृत व्यंगचित्रं फॉरवर्ड करत बसतो... अधिक वाईट काय? उच्चशिक्षितांची विकृती की राजकीय कार्यकर्त्यांची गुंडगिरी? सामान्य माणसांनी संभ्रमित व्हावी. अशी परिस्थिती आहे. शिक्षणाने मेंदूला कल्हई होते. हा गैरसमज आहे. सडलेला मेंदू शिक्षणाने दुरुस्त होत नाही. हेच दाखवणारी ही उदाहरणे आहेत.

सरकारपुरस्कृत दहशतवाद निषेधार्हच, परंतु गेली सहा वर्षे देशभर दलित, अल्पसंख्यांकविरोधात, विद्यापीठातील विद्यार्थ्यांविरोधात केंद्रसरकार पुरस्कृत दहशतवादाला उधाण आले आहे. त्याच भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारपुरस्कृत दहशतवादाचा उल्लेख करावा, याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.

सोशल मीडियावर विकृतांचा नंगानाच सुरू आहे. त्यावर कायद्याने काही कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु राज्याचा सायबर क्राईम विभाग हा अत्यंत मागास आणि निष्क्रिय विभाग आहे. मला वाटते पोलीस खात्यातले निष्क्रिय, कामचुकार लोक गुप्तवार्ता विभागात भरतात तसेच काहीसे सायबर क्राईम विभागाचे झाले असावे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे मोकाटांना मोकळे रान मिळते. त्यांनी थोडी सक्रियता दाखवली तरी असले हल्ले रोखता येतील. त्यांच्याकडून कारवाई होत नाही. म्हणून कायदा हाती घेण्याचे प्रकार घडतात. मनसे कार्यकर्त्यांनी केलेले हल्ले, मागे आव्हाडांच्या कार्यकार्यकर्त्यांनी केलेली मारहाण आणि आता शिवसेना कार्यकर्त्यांचा हल्ला हे सगळे निषेधार्ह आहे. संबंधितांवर कारवाई झालीय, पण सायबर क्राईम विभागाने सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या संबंधितांवर केलेली कारवाईही समोर यायला पाहिजे. नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. नौदलात काम केले म्हणून विकृतीचा प्रसार करण्याचे लायसन मिळत नाही.

याच न्यायाने मग रिया चक्रवर्तीच्या वडिलांच्या सन्मानाची भाषा का केली नाही? रियाचे वडीलही निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. म्हणून त्यांच्या मुलीला ड्रग्जसाठी परवानगी द्यायची काय ?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा बोलताना शर्मा यांनी अशी चित्रे तयार कारणारांवर कारवाई करावी, असे म्हणणे मांडले. म्हणजे तुमची जबाबदारी काहीच नाही का ?

दुसरी गोष्ट म्हणजे हे शर्मा आता कंगना रानावतची भाषा बोलू लागले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट वगैरे. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

शिवसेना कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध. उद्या त्यांनी एखाद्या पान टपरीवाल्यावर हल्ला केला तरी ते तेवढेच निषेधार्हच असेल. विकृत कुणीही असले तरी त्यांच्यावर कारवाई कायदेशीर मार्गानेच झाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या यंत्रणा हलवाव्यात. शिवसैनिकांना वेगळे कार्यक्रम द्यावेत. तुमच्या यंत्रणा झोपा काढतात म्हणून केंद्रीय यंत्रणा येऊन इथं शोबाजी करत बसतात.

- विजय चोरमारे

Similar News