न घडलेल्या इतिहासाची कहाणी!

सुभाषचंद्र बोस यांची अपघाती निधन झाले नसते तर देशाचा इतिहास वेगळा असता का, तो कसा असू शकला असता, याची मांडणी केली आहे अजित जोशी यांनी...

Update: 2021-01-23 16:07 GMT

इतिहासात जरतरला अर्थ नसतो हे खरं, पण काही जरतर बद्दल विचार करणं अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक असू शकतं. छत्रपती अवघ्या ५४ व्या वर्षी निधन पावण्याऐवजी अजून २० वर्षं जगते तर? हा जसा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तसाच ४८ व्या वर्षी सुभाषबाबू अपघातात गेले नसते तर, हाही आहे. आज त्यांच्या जयंती त्याविषयी थोडं मुक्त चिंतन…

नेताजी जर हयात असते, तर सगळ्यात पहिला प्रश्न उभा राहीला असता, त्यांच्यावर युद्धगुन्हेगार म्हणून खटला चालवायचा… अर्थात त्यांच्या साथींसाठी जर पंडितजींनी पुन्हा वकिलीचा काळा झगा चढवला, तर आपल्या या परममित्रासाठी तर ते नक्कीच उभे राहिले असते, गरज पडती तर अगदी न्यूरेंबर्गलासुद्धा. शिवाय सुभाषबाबूंचा व्यक्तिगत करिष्मा लक्षात घेता त्यांना सजा फर्मावणं ब्रिटिशांनाही कठीणच गेलं असतं. अडचण एव्हढीच होती, की नेताजी ज्यांच्या बाजूने गेले त्या जर्मनी आणि जपानची निर्दय, क्रूर आणि विकृत पापं युद्ध संपताना अधिकाधिक उघडकीला येत होती. त्यामुळे पाश्चिमात्य देशातल्या उदारमतवादी भारतप्रेमींनाही नेताजींना पाठिंबा देणं कठीण गेलं असतं. अर्थात या कोणत्याही छळ छावण्यात बोसांचा स्वतःचा किंवा आझाद हिंद सेनेचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, ही बाब त्यांच्या जमेची…

स्वातंत्र्य मिळण्याच्या प्रक्रियेतला सुभाषबाबूंचा सहभाग वेधक राहिला असता. त्यांच्या यापूर्वीच्या भूमिका लक्षात घेता, अल्पसंख्याकांना अधिकाअधिक हक्क देऊन अखंड भारत टिकवायची भूमिका कदाचित त्यांनी घेतली असती. आणि मग ती बापूंच्या जवळ जाणारी ठरली असती. पण त्यात त्यांना पंडितजी आणि सरदार यांचा कट्टर विरोध झाला असता, अशी मांडणी करता येईल. अर्थात त्यामुळे फाळणी टळून देशांतर्गत धार्मिक प्रश्न अधिक गंभीर झाले असते का? का फाळणीतल्या वेदना कमी करण्यात त्यांनी जास्त सहभाग घेतला असता? असे अनेक प्रश्न अंदाज बांधता येणार नाहीत, एवढे अनुत्तरित राहतात.


अजून एक गोष्ट… सुभाषबाबूंचं व्यक्तिगत गांधीप्रेम लक्षात घेतलं, तर कदाचित त्यांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांनी बापूंना कायमस्वरूपी संरक्षण द्यावं, असा आग्रह धरणं शक्य होतं. (त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात कोणत्याच बाजूकडे अश्या स्वरूपाचे प्रशिक्षित जवान नव्हते.) अश्या वेळेला नथुराम कदाचित आधीच पकडला गेला असता. अर्थात गांधीजींचं आयुष्य असंही कमी राहिलेलं होतं. पण हे कदाचित थोडं अतिरंजितही वाटू शकेल.

पण नेताजी हयात असते, तर खरी कलाटणी मिळाली असती, स्वातंत्र्योत्तर इतिहासाला… नेताजी कोणत्या बाजूला गेले असते? हिंदू महासभा/संघ वगैरे हिंदू जमातवाद्यांना कट्टर विरोध हा त्यांच्यात आणि नेहरूंच्यात सामायिक दुवा होता. समजा, फाळणी झाली नसती किंवा गांधीहत्या टळल्यामुळे हिंदुत्त्ववाद्यांचा खरा चेहरा वेळेत उघड झाला नसता, तर कदाचित स्वतंत्र भारताचे प्रश्न धार्मिक मुद्द्यांभोवती फिरते. आणि मगप

पंडितजी आणि नेताजी यांनी जोडीने बहुसंख्यांकवादी राजकारणाला शह दिला असता, यात शंका नाही. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यानंतरच्या किमान ३० वर्षांच्या राजकारणात मुख्य संघर्ष काँग्रेस विरुद्ध साम्यवादी/समाजवादी यांच्यातच होता. कारण ते मुख्यत्त्वे आर्थिक मुद्द्यांवर होतं. आणि नेताजी तर पंडितजींहून अधिकच कट्टर समाजवादी होते. शक्यता अशी आहे, की त्या परिस्थितीत डाव्यांना एक मोठा राष्ट्रीय नेता मिळाला असता आणि खरोखर ती एक महत्त्वपूर्ण घटना असती.

कारण स्वातंत्र्यानंतर एकीकडे विशुद्ध भांडवलवादी असा पक्ष उभाच राहिला नाही (तो आजपर्यंत!). त्यामुळे भांडवलदारांना नाईलाजाने हिंदुत्त्ववाद्यांच्या वळचणीला जावं लागलं. दुसरीकडे डावे पक्ष अनेक असले, तरी नेहरूंच्या तोडीचा राष्ट्रीय नेता त्यांना कधीच मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष, ही एकाच वेळेला डाव्या आणि भांडवली, अश्या दोन्ही विचारांची अपरिहार्य भट्टी बनली. नेताजी असते, तर कदाचित रिपब्लिक विरुद्ध डेमोक्रॅट असा पाश्चिमात्य पध्द्तीचा द्विपक्षीय संघर्ष उभा राहू शकला असता. अर्थात यात पंडितजींना भांडवली बाजूने उभं पाहणं अशक्य वाटतं. त्यामुळे मग हा मध्यममार्गी डावे विरुद्ध अति-डावे असा संघर्ष दिसला असता. (म्हणजे अमेरिकेत जसा मध्यममार्गी उजवे विरुद्ध अति उजवे दिसतो तसा…)


नेहरूंचा दृष्टिकोन समतोलवादी आणि कट्टर अहिंसक. तर सुभाषबाबू आपल्या आदर्शवादाच्या आवेगात कोणत्याही टोकाला जायला तयार असणारे. स्वाभाविकच सुभाषबाबूंच्या असण्याचा मोठा परिणाम दोन महत्त्वाच्या खात्यांवर झाला असता, परराष्ट्र आणि संरक्षण. पंडिजींनी सैन्याला राजकारणातुन पूर्णपणे वेगळं ठेवण्याचा अट्टाहास बाळगला आणि ती संस्कृतीही रुजवली. नेताजींनी कदाचित सैन्याच्या राजकीय प्रशिक्षणाचा आग्रह धरलाही असता आणि मग देशाच्या भविष्यालाच वेगळं वळण लागलं असतं. दुसरीकडे अलिप्ततेचा पुरस्कार करत नेहरूंनी सोव्हिएट आणि अमेरिकन, दोन्ही कॅम्पातून मदत मिळवली. सुभाषबाबूंना हे पटलं असतं का, ते सांगणं कठीण आहे. त्यांनी बहुदा थेट रशियाच्या गटात जाण्याची भूमिकाही घेतली असती, असं म्हणायला वाव आहे. असं होतं, तर आंतरराष्ट्रीय राजकारण आणि खासकरून इस्लामचा उदय, यावर दूरगामी परिणाम घडले असते.

नेताजी हयात असते, तर डाव्याच्या काँग्रेसविरोधाला निव्वळ नेहरूविरोधाचं व्यक्तिगत स्वरूप कध्धीच आलं नसतं. (शेवटी सिंगापूरला जाऊनही नेताजींच्या ब्रिगेडना नेहरू आणि गांधींचीच नावं होती). त्यामुळे बोस नक्कीच डाव्यांचे नेते आणि बहुदा नेहरूंचे विरोधक म्हणून उभे राहिले असते, तरी त्या नादात धार्मिक शक्तींना जवळ करण्याची चूक त्यांनी नक्कीच केली नसती. भारतातल्या हिंदुत्त्ववाद्यांचं राजकीय उत्थापन, हे समाजवाद्यांच्या साठी ते नव्वदीपर्यंतच्या जवळीकीतून झालेलं आहे. साहजिकच, नेताजींच्या हयातीत हे घडलं असतं का, आणि पुढे बनली तशी भाजप सरकारं बनू शकली असती का? याही प्रश्नांना जागा आहे.

दुसरीकडे जर नेहरू आणि बोस या दोन मित्रांनी एकत्र काम केलं असतं, तर राजकीय संघटनाकडे जास्त लक्ष मिळालं असतं. नेहरू परिवाराच्या सातत्यपूर्ण काँग्रेस नेतृत्त्वामागे पर्यायाचा अभाव, हा मोठा घटक कारणीभूत ठरतो. नेताजींनी अवघ्या काही महिन्यात प्रशिक्षित केलेल्या आझाद हिंद सेनेच्या साथींनी पुढची अनेक दशकं साम्यवादी चळवळीत भरीव काम केलं. त्यामुळे काँग्रेस पक्षातही त्यांनी असे सशक्त पर्याय प्रशिक्षित केले असते, असं म्हणायला वाव आहे. थोडक्यात नेताजी जर काही काळ जगते, तर राहुल आणि मोदी, हे दोघेही आहेत त्या स्थानी दिसले नसते, असं म्हणणं म्हणजे इतिहास आणि वर्तमानाचा फार मोठा विपर्यास होत नाही.

असो, या टप्प्यावर आलं, की हा प्रश्न अभ्यासपूर्ण चर्चेचा न राहता राजकीय वितंडवादाचा होऊन जातो. या चर्चेचा उद्देश निव्वळ स्वप्नरंजनाचा नाही. नेताजींचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या राजकीय भूमिका आणि त्यांचं जीवनकार्य या सगळ्याचा त्यांनी न पाहिलेल्या भविष्याच्या पटलावर केलेला हा विचार होता. यातून नेताजी जसे नव्याने उलगडू।शकतात, तसंच घडलेल्या त्यांच्यानंतरच्या इतिहासाचे संदर्भही अधिक समजू शकतात. आणि तोच अश्या प्रयोगामागचा खरा हेतू असतो...

Tags:    

Similar News