सी. आर. झेड. म्हणजे नक्की काय?

Update: 2021-10-24 04:52 GMT

अनेक वेळा सीआरझेड हा शब्द आपल्या कानावर पडतो. मात्र, CRZ म्हणजे नक्की काय? हे तुम्हाला माहिती आहे का? वाचा प्रा. भूषण भोईर यांनी सोप्या शब्दात सांगितलेली माहिती...

नुकताच सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सिंधुदुर्ग पाठोपाठ पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सीआरझेड संदर्भात ऑनलाइन जनसुनावणी घेण्याची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर बऱ्याच ठिकाणी सीआरझेड संदर्भात जाणते-अजाणतेपनाने समज-गैरसमज येथे राहणाऱ्या लोकांमध्ये पेरले गेले आहेत. बहुधा लोकांना सीआरझेड म्हणजे नक्की काय? हेच माहिती नसल्यामुळे लोक त्यांच्या फायद्यासाठी केल्या गेलेल्या कायद्यालाच विरोध करत असताना दिसतात. तरी हे सर्व गैरसमज दूर व्हावेत म्हणून आजपासून त्यावर लिहिणे सुरू करत आहे.


What is meant by Coastal Regulation Zone?

सीआरझेड म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन. ( CRZ: coastal regulation zone) म्हणजेच सागरी प्रभाव क्षेत्र. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर दरवर्षी पावसाळ्यात सर्वात मोठ्या पुराच्या वेळेस समुद्राचे पाणी ज्या ठिकाणापर्यंत जमिनीवर येते. त्या ठिकाणापासून पुढे साधारणतः पाचशे मीटर पर्यंत असलेला सर्व भू भाग म्हणजेच crz.

हा कोण्या माणसाने निर्माण केलेला नाही. हा भाग समुद्राने निर्माण केलेला आहे. हे आपण पहिले लक्षात घेतले. पाहिजे. माणसाने तर फक्त सीआरझेड कायदा निर्माण करून कायद्याने हा भूभाग अधोरेखित केलेला आहे. कायदा अस्तित्वात असो वा नसो, निसर्ग आणि समुद्र ह्या भागात त्यांचे कायदे पाळतच राहणार आहेत. हे आपणा सर्वांनी आपल्या शेंडीला गाठ मारून चांगले लक्षात ठेवलं पाहिजे.

ह्या भूभागावर माणसाची नाही तर समुद्राची सत्ता चालते. जास्त शहाणपणा केला आणि या ठिकाणी मोठमोठी बांधकामे, कारखाने रस्ते बांधून समुद्राचे पाणी अडवून खाजण जमिनीमध्ये भराव करून त्या क्षेत्रावर अतिक्रमण केल्यास एका क्षणात समुद्र तुम्हाला तुमची जागा काय ती दाखवून देतो.

नीट पाहिले असता असे लक्षात येईल की, हे भूभाग नेहमीच समुद्राच्या बाजूला उतार असलेले असतात. ज्या मुळे पावसाचे पाणी छोट्या छोट्या झरे, नाल्या व खाडी मार्फत समुद्रात आणले जाते. त्याच प्रमाणे समुद्राचे पाणी देखील भरती ओहोटीच्या वेळी येथे ये जा करत असते.

आजपासून साधारण 30 वर्षांपूर्वी हे सागरी प्रभाव क्षेत्र बिनदिक्कत आपली सत्ता उपभोगत होते. पुढे हळू हळू विकास होत गेला आणि ह्या सागराच्या सत्तेला दोन भागात विभागणारे सागराच्या समांतर रस्ते ह्या क्षेत्रात आले.


ज्यामुळे आता पावसाळ्यात जमिनीकडून सागराकडे वाहणाऱ्या पाण्याला रस्त्याचा अडथळा होऊ लागला. आणि फक्त काही ठिकाणी जिथून पाणी निघून जाण्यासाठी रस्त्याखाली पाण्याचे पाईप बसवले होते. अश्याच ठिकाणी पाण्याची ये जा होऊ लागली. त्याचप्रमाणे समुद्रातून भरती ओहोटीच्या वेळी येणाऱ्या पाण्याला देखील ह्या रस्त्याचा अडथळा निर्माण झाला. (पुढे ह्या ठिकाणी भराव करून मोठमोठी निवासी संकुले बांधण्यात आली. ज्या मुळे पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला, आणि कधी नव्हे ते किनारी भागात पुराचे पाणी गावात घरात शिरायला सुरुवात झाली.)

हे क्षेत्र म्हणजे अतिशय सुपीक आणि जीवनाने भरभरून असणारे क्षेत्र ज्यामुळे कोकणातल्या शेकडो पिढ्यांनी या जमिनीवर शेती केली, मासेमारी केली त्याचं सर्व श्रेय नद्या, खाड्यानी, पुराने वाहून आणलेल्या गाळाला जाते.

ज्यामुळे येथील जमीन सुपीक तर झालीच शिवाय येथून वाहून जाणारे गाळ युक्त पाण्याने समुद्रातल्या जीवांचे देखील पोट भरले. पुढे हेच जीव किनारपट्टीवर राहणाऱ्या देखील लोकांचे पोट भरत होते. काळ लोटला, माणस शिकली, शेती मातीशी असलेलं घट्ट नातं तुटलं, पुढे हळू हळू गावातली माणस शहरात आली, शहरात फ्लॅट घेण्यासाठी गावची शेती विकणे सुरू झालं, काहींनी शेती विकून गावातच उरलेल्या तुकड्यावर सिमेंट काँक्रिट चे बंगले बांधायला सुरुवात झाली.

आता विकलेल्या सीआरझेड CRZ मधल्या शेतात भराव होऊन मोठं मोठी बांधकाम उभी होऊ लागली. हे सुरू होते ना होते तोच सीआरझेड CRZ कायदा आला. आणि ह्या बांधकामांना चाप बसला. कायद्याने का असेना माणसाने सागराच्या सत्तेच अस्तित्व मान्य केलं.

पण हे काही फार काळ टिकणार नव्हतं. सीआरझेड CRZ सोडून उरलेल्या क्षेत्रावर गगनचुंबी इमारती, बंगले उभे राहिले आणि बांधकाम व्यावसायिकांना प्रोजेक्टसाठी जागा संपल्या, आणि त्यांचा मोर्चा सीआरझेड CRZ कडे वळाला.



येथील जागा सीआरझेड CRZ आहे अस सांगून किंमती कमी करून स्वस्तात विकत घेतल्या. आणि हे क्षेत्र कायद्याने संरक्षित करत असलेल्या MCZA. म्हणजेच महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी च्या परवानग्या घेऊन ह्या क्षेत्रात देखील मोठं मोठ्या इमारती उभ्या करून ह्यांनी बक्कळ पैसा कमवायला सुरुवात केली. पण ह्या ठिकाणी असलेल्या जमिनी स्वस्तात विकत घेता याव्या म्हणून सर्वसामान्य गरिबांना मात्र, ह्या ठिकाणी बांधकाम करता येत नाही अस सांगत राहिले.

ज्यामुळे येथील गोरगरीब लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले. (ह्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सीआरझेड CRZ मध्ये नवीन बांधकाम करायचे असल्यास mczma ह्या प्राधिकरणाची परवानगी घेऊन बांधकाम करता येत होते. पण सरसकट बांधकाम करता येणार नाही असं सांगून त्यांची दिशा भूल करून बिल्डरच्या फायद्यासाठी ह्यांना सीआरझेड CRZ कायद्याविरूद्ध उभे केले गेले.) सीआरझेड CRZ संदर्भात लोकांचा संभ्रम वाढत होता.

त्याचा फायदा बांधकाम व्यवसायिक आणि राज्यकर्ते उचलत होते. पाठोपाठ नोटाबंदी जाहीर झाली आणि इथेच सीआरझेड CRZ कायदा मोडतोड करण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. नोटाबंदी मध्ये बिल्डर कडे असलेला काळा पैसा गडप झाला. बांधकाम व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले. बांधकाम व्यावसायिकांना खुश करण्यासाठी त्यांना सीआरझेड CRZ चे क्षेत्र कमी करण्यात येणार आहे. ही टीपः राजकीय वर्तुळातून मिळाली, आणि राजकीय वर्तुळातून, बांधकाम व्यावसायिकांकडून सीआरझेड CRZ चा अपप्रचार जोरात सुरू झाला आणि आम्हा मच्छीमारांनी ह्या प्रचाराला बळी पडून सीआरझेड CRZ ला विरोध करायला सुरुवात केली. सरकार आणि कारखानदार, बांधकाम व्यावसायिक जे ह्या समृध्द क्षेत्रावर डोळे ठेवून बसले होते. त्यांना हवं तसे झालं. आणि आम्ही त्यांना हवी असलेली पार्श्वभूमी तयार केली.

सीआरझेड CRZ कायदा मोडतोड करताना आम्ही फार चांगले झाले ह्या भ्रमात होतो.

क्रमशः.....

टीप: तुम्ही सीआरझेड CRZ कायदा पाळा अगर नका पाळू निसर्ग त्याचे कायदे काटेकोर पणाने पाळत असतो. तुम्ही ह्या क्षेत्रात भराव करून घरे बांधली असतील तर समुद्र तुमच्या घरात शिरून पुराच्या गाळाने भराव केल्याशिवाय राहत नाही.

पुढील भागात: सीआरझेड CRZ क्षेत्रात भराव कोळंबी प्रकल्प, बांधकाम केल्याने समुद्रातील मासेमारी कमी होत गेली. भरती ओहोटी चे पाणी प्रभावित झाल्यामुळे पुराचे पाणी गावात शिरू लागले. जमिनी खारट झाल्या.

प्रा. भूषण भोईर.

M. Sc. Ocenography.

सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग,

सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,

Tags:    

Similar News