आज अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदासाठी निवडणूक होत आहे. तीन प्रमुख उमेदवार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे तिशीतील जोहरान ममदानी, रिपब्लिकन पक्षाचे कर्टीस सिलवा आणि सारी हयात डेमोक्रॅटिक पक्षात घालून आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे सत्तरीतील अँड्र्यू क्युमो.
गेले काही महिने निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारात जोहरान ममदानी यांनी आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रचारादरम्यान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहरातील कामगार, विद्यार्थी, तरुण, सामान्य नागरिकांच्या भौतिक प्रश्नांना केंद्रस्थानी आणले आहे. ही मांडणी अमेरिकेतील कॉर्पोरेट, वॉल स्ट्रीट धार्जिण्या सत्ताधारी वर्गाला आव्हानात्मक वाटते.
ममदानी यांना डोनाल्ड ट्रम्प पासून अनेकजण कम्युनिस्ट म्हणून लेबल लावत आहेत. जणुकाही कम्युनिस्ट विचार मानणे म्हणजे गुन्हा असल्यासारखे…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला, कर्टिस सिल्वा यांना पाठिंबा देणे अपेक्षित होते. पण ट्रम्प यांचा अजेंडा ममदानी यांना कोणत्याही परिस्थितीत न्यूयॉर्क शहराचा महापौर होऊ द्यायचा नाही हाच आहे. त्यासाठी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला वाऱ्यावर सोडून अँड्र्यू क्युमो यांना न्यूयॉर्कच्या नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करत आहेत.
संसदीय निवडणुका होणाऱ्या प्रत्येक देशात विविध राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात. आपल्या आर्थिक हितसंबंधांना नख लावणारा नेता उमेदवार निवडून येऊ नये म्हणून त्या देशातील प्रस्थापित वर्ग नेहमी सजग असतो.
जोरान ममदानीच्या रूपामध्ये अमेरिकेतील प्रस्थापित वर्गाला भविष्यात उभा राहू शकणारा असा तरुण/ तिशीतील नेता दिसत आहे. त्याचे राजकीय करियर आत्ताच संपवण्याचे अमेरिकेतील प्रस्थापित वर्गाने ठरवले आहे.
प्रस्थापित वर्गातील वर्गीय एकी म्हणजे काय हे बघायचं असेल तर अमेरिकेतील सत्ताकारण एक केस स्टडी आहे. ट्रम्प यांचे ममदानी यांना पराभूत करण्यासाठी अँड्र्यू क्युमो यांना पाठिंबा देण्याचे आवाहन हा त्याचाच एक भाग आहे.